योगेश बोरसे, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील चांदणी चौकाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही चांदणी चौकाचा कसा फटका बसला, हे सांगताना मुख्यमंत्री कार्यक्रमाला का आले नाही? हे कारण सांगितले. त्यावेळी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय बातम्यांवर भाष्य करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनाही घेरले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नितीन गडकरी यांच्या कामांचे कौतूक केले.
चांदणी चौकमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होता. तासनतास या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. या वाहतूक कोंडीने कोणालाही सोडले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जात असताना त्यांनाही या कोंडीचा फटका बसला होता. त्यानंतर त्यांनी आढावा बैठक घेऊन काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश काढले होते, ही आठवण अजित पवार यांनी आपल्या भाषणातून काढली.
आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनाही येण्याची इच्छा होती, कारण ते सुद्धा या वाहतूककोंडीत अडकले होते. परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते आज आले नाहीत, हे माध्यमांनी लक्षात घेतले पाहिजे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी सुरुवातीलाच केले.
दोन दिवसांच्या बातम्या बघा अजित पवार यांनी मिटिंग घेतली, असा प्रचार सुरु होता. पण विकास कामांसाठी आम्ही बैठका घेतल्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. आम्ही कोणतेही निर्णय घेतले तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या असणार आहे. विरोधी पक्षनेते नवीन आहेत, त्यांना कुठे कोल्डओर दिसले, हे माहीत नाही. पण आमच्यात कोल्ड पण नाही, वॉर पण नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.
पुणे शहरातील चांदणी चौक पूल हा गेम चेंजर ठरणार आहे, असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतूक करताना ते म्हणाले की, नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीने देशात रस्त्यांची उभारणी केली, त्यामुळे त्यांना रोडकरी म्हटले जात होते. मात्र आता त्यांना विकासकरी म्हणावे लागेल. पूर्वी प्रकल्पांची घोषणा व्हायची आधी भूमिपूजन एक पंतप्रधान करायचे उद्घाटन दुसरे पंतप्रधान करत होते. मात्र आता भूमिपूजनही आताचे पंतप्रधान करतात आणि उद्घाटनही तेच करतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लागवला.