प्रदीप कापसे, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरात आजपासून ही समस्या संपणार आहे. पुण्यातील चांदणी चौक उड्डणपुलाचे लोकर्पण शनिवारी होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर राहणार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
चांदणी चौक पुलाचे आज लोकार्पण होत असल्यामुळे डॉग पथक आणि बॉम्बशोध पथकाने परिसराची तपासणी केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी केली गेली. व्हिआयपी नेते असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.
पुढील ५० वर्षांचा विचार करुन चांदणी चौक पुलाची उभारणी करण्यात आली आहे. दिवसाला दीड लाख वाहने या ठिकाणावरुन सुसाट धावू शकतील. १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या भीषण अपघातांबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी बैठक घेणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. बैठकीत राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आढावा घेणार आहे. या बैठकीनंतर राज्यात अनेक नवे वाहतूक नियम लागण्याची शक्यता आहे.