पुणे 12 ऑगस्ट 2023 : पुणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी… पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला हजेरी लावणार नसल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी नवे वाहतुक नियम लागू होण्याची शक्यता आहे. आज त्या संदर्भात बैठक पार पडणार आहे. त्यामुळे पुणेकरांसह राज्यातील नागरिकांच्या नजरा पुण्याकडे लागल्या आहेत.
पुणेकरांना वाहतुकीसाठी महत्वाचा असणारा चांदणी चौक उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अवघ्या 10 महिन्यात या उड्डाणपूलाचं काम पूर्ण झालं. आज या पुलाचं उद्घाटन होत आहे. पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
चांदणी चौक परिसरात काल संध्याकाळी डॉग पथक आणि बॉम्बशोध पथक दाखल झालं. त्यांनी परिसराची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण परिसराची चाचपणी करण्यात आली. बॉम्बशोधक पथकाकडून संपूर्ण पेंडॉलची तपासणी करण्यात आली. पुणे पोलिसांचं एक पथकही काल संध्याकाळी कार्यक्रम स्थळी दाखल झालं आहे. उद्घाटनाची सगळी तयारी पूर्ण करण्यात झाली आहे. सगळीकडे नितीन गडकरींच्या आभाराचे बँनर झळकवण्यात आले आहेत.
पुण्यात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. आजच्या बैठकीत महाराष्ट्रात अनेक नवे नियम लागण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आढावा घेणार आहेत. अपघातानंतरच्या चौकशी अहवालाचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आढावा घेतील.
चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज महायुतीचं पुण्यात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या स्वागताचे चांदणी चौकात बँनर झळकले आहेत. चांदणी चौकाचे स्टार उजळले, अशा आशयची बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडेही लावण्यात आले आहेत. नितीन गडकरींचे बँनरच्या माध्यमातून महायुती सरकारने आभार मानण्यात आले आहेत.