पुणे : पुणे शहरात जन्मलेले एका शिक्षक आणि वास्तूविशारदाचा मोठा गौरव झाला आहे. किंग चार्ल्स तिसरे यांच्या राज्याभिषेक समारंभासाठी त्यांना आमंत्रित केले आहे. सामाजिक कार्याच्या गटातून त्यांना आमंत्रण दिले आहे. प्रिन्स फाऊंडेशनचे स्कॉटिश मुख्यालय असलेल्या आयरशायर येथील डमफ्रीज हाऊसकडून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. या समारंभासाठी जगभरातून 2,200 लोकांना आमंत्रित केले गेले आहे.
कोणाची झाली निवड
पुणे शहरात जन्मलेले सौरभ फडके यांना यासाठी निमंत्रण मिळाले आहे. सौरभ फडके शिक्षक आणि वास्तूविशारद आहे. त्यांची राज्याभिषेक समारंभात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली होती. चार्ल्स यांनी स्थापन केलेल्या फाऊंडेशनकडून फडके यांना आमंत्रण दिले आहे. चार्ल्सने ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ असताना हा फाउंडेशन सुरू केला. वास्तुविशारद असलेले फडके चॉल्स यांच्या फाउंडेशनच्या बिल्डिंग स्किल्स प्रोग्राममध्ये सामील झाले होते. त्याठिकाणी प्रशिक्षण घेऊन त्यांनी कौशल्ये वाढवली.
चार महिने होता निवास
प्रिन्स फाऊंडेशनचे स्कॉटिश मुख्यालय असलेल्या आयरशायर येथील डमफ्रीज हाऊसमध्ये चार महिने फडके यांचा निवास होता. त्याकाळात त्यांनी व त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनी तेथे नवीन शैक्षणिक मंडप तयार केला. प्रिन्स फाऊंडेशन स्कूल ऑफ ट्रॅडिशनल आर्ट्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी फडके यांना अल्बुखारी फाऊंडेशन शिष्यवृत्तीही मिळाली. फडके आता त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करतात.
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर सौरभ फडके काही वर्षांपूर्वी इंग्लड गेले. फडके यांच्या पत्नी पर्सिस यांना लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये भूगोल विषयात पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. त्यामुळे त्यांच्यासोबत तेही ब्रिटनला गेले.
काय म्हणतात फडके
फडके यांना शाही निमंत्रणाबद्दल विचारले असता ते म्हणाले, “मला अजूनही विश्वास बसत नाही. कारण मी यापूर्वी कधीही राज्याभिषेकाला गेलो नाही.”
भारतातून उपराष्ट्रपती करणार प्रतिनिधीत्व
उपराष्ट्रपती जगदीप धनखड भारतातून या समारंभासाठी जाणार आहे. भारताचे ते प्रतिनिधीत्व करणार आहे. यापूर्वी जून 1953 मध्ये दिवंगत महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचा राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर आता राज्याभिषेक समारंभ होत आहे. येत्या शनिवारी हा समारंभ होणार आहे. समारंभात 100 राष्ट्राध्यक्ष सहभागी होणार आहेत.