पुणे : पुणे शहर राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून पुण्याची ओळख बदलू लागली आहे. कोयता गँग अन् गुन्हेगारीचा कळस पुण्यात झाला आहे. रस्त्यात कोयता घेऊन दहशत माजवली जात आहे. भर रस्त्यात तलवारीने केक कापला जात आहे. यावर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. गुन्हेगारांना अटक होत आहे. परंतु गुन्हेगारी कमी होत नाही. आता कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई पोलीस आयुक्तांनी केली आहे. या सर्व घडामोडीत पुणे शहरात कोयतावरुन पती अन् पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. अगदी एकमेकांना जखमी करण्यापर्यंत हे भांडण गेले. मग हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.
पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील एका सोसायटीत हा प्रकार घडला आहे. नेमके काय झाले तर कुळकर्णी नावाचे एक व्यक्ती सलूनचे दुकान असलेल्या व्यक्तीकडे आले. त्यांना झाडे कापण्यासाठी कैची किंवा कोयता हवा होता. मात्र सलून चालकाने सध्याची परिस्थिती पाहून कोयता विकण्यास नकार दिला. मग त्या व्यक्तीची पत्नी आली अन् कोयता विकून टाका, असे सांगितले. परंतु पतीने कोयत्याचा कोणी गैरवापर केल्यास आपली पोलीस चौकशी सुरु होईल, आपणास त्रास होईल, असे त्याच्या पत्नीला सांगितले.
पतीचा नकारामुळे पत्नीला राग आला. तुम्हाला घरात भंगार ठेवायला का आवडते? चार पैसे मिळत असतील कोयता का देत नाही, असे तिने सांगितले. याच विषयावरुन शब्दाला शब्द सुरु झाला. वाद वाढत गेला. हाणामारी सुरु झाली. त्यानंतर पत्नीने हातातील कोयत्याने आपणास मारल्याचा आरोप पतीने केला. दुसरीकडे पत्नीने पतीवर आरोप केला. पतीने आपणास कोयत्याने डोक्यावर मारल्याचे सांगितले. या घटनेत दोन्ही जण जखमी झाले आहे. पोलिसांनीही दोन्ही जणांचा फिर्यादीवरुन एकमेकांवर गुन्हा दाखल केला आहे. जखमी झालेल्या पती, पत्नीवर उपचारही करण्यात आले आहे. परंतु पती-पत्नीचे हे भांडण चर्चेचा विषय ठरले आहे.
हे ही वाचा
पुणे कोयता हल्ल्यातून वाचलेल्या मुलीनेच सांगितली आरोपीची A to Z माहिती