पुणे | 17 सप्टेंबर 2023 : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत म्हणून अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. शहरात विक्रीसाठी आलेल्या खाद्यपदार्थांची तपासणी एफडीआय करणार आहेत. सणांच्या काळात भेसळ रोखण्यासाठी पुणे शहरात एक समितीची स्थापन करण्यात आली आहे. आता गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत अन्न व औषध प्रशासनाची तपासणी मोहीम राहणार सुरू आहे. नियम न पाळणाऱ्या खाद्य विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
पुणे शहरात गणेशोत्सवात दरम्यान जड वाहनास बंदी घालण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांना बंदी असणार आहे. या दरम्यान शहरात कोणत्याही जड वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. पुणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुणे शहरातील लक्ष्मी रोड, केळकर रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, जंगली महाराज रोड, एफसी कॉलेज रोडवर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य वन विभागाकडून राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या संचालकांवर गुन्हा केला आहे. अनाथालयात प्राण्यांच्या सुरक्षितेची काळजी त्यांनी घेतली नाही. तसेच उपचारांसाठी आलेल्या वन्यप्राण्यांचे परवानगीशिवाय प्रजनन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अनाथालयात दाखल झालेले वन्य प्राणी आणि निसर्गात सोडलेल्या वन्य प्राण्यांच्या नोंदीमध्ये तफावत आढळली आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुण्यातून गावी जाण्यासाठी या बसेस सोडण्यात आल्या आहेत. पुणे बसस्थानकावर नागरिकांची चांगलीच गर्दी झाली आहे. स्वारगेट बस स्थानक, शिवाजीनगर बस स्थानकावरुन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली. पुण्याहून कोकण आणि मराठवाड्यात जाण्यासाठी नागरिकांची बस स्थानकांवर चांगलीच गर्दी झाली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडल्या जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “पुणे ऑन पॅडल्स” या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरुड विधासभा मतदार संघाच्या माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी या रॅलीचे आयोजन केले होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, भाजपचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे, डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली.