पुणे | 25 ऑगस्ट 2023 : राज्यातील सर्व गणेशभक्त आता गणेशोत्सवाची वाट पाहत आहेत. यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी गणेश मंडळांची तयारी जोरदार सुरु आहे. यंदा गणेशोत्सवावर चंद्रयान-३ चा प्रभाव असणार आहे. पुणे आणि मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी चंद्रयानची आरास तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा गणेशभक्तांना अध्यात्मासोबत विज्ञान अनोखा संगम पाहण्यास मिळणार आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या चतुर्थीला गणरायाची स्थापना केली जाते. यंदा 19 सप्टेंबर रोजी चतुर्थी येत असल्यामुळे दहा दिवसांचा हा उत्सव त्या दिवसापासून सुरु होणार आहे. पहिल्या दिवशी गणरायाची स्थापना करण्यात येणार आहे. सर्वाजनिक गणेश मंडळ या उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. 23 ऑगस्ट रोजी भारताचे चंद्रयान यशस्वीपणे लॅण्डींग झाले. भारतीय अंतराळ संस्थेने (इस्त्रो) केलेल्या या कामगिरीचा जगभरात कौतूक होत आहे.
भारताच्या चंद्रयानचे यश आता गणेशोत्सवात दिसणार आहे. पुणे शहरातील अनेक मंडळांनी या विषयावर देखावा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत अनेक मंडळे चंद्रयानवर आरस तयार करण्याच्या कामाला लागले आहे. यामुळे यंदा गणरायासोबत विज्ञानाचे अनोखे दर्शन देखाव्यांच्या माध्यमातून गणेशभक्तांना होणार आहे.
पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने गणेशोत्सवासंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. मंडळाने विसर्जन मिरवणुकीत पहिल्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी याबाबत बोलताना सांगितले की, मागील वर्षापर्यंत विसर्जन मिरवणुकीत मंडळ दुसऱ्या दिवशी पहाटे सहभागी होत होता. परंतु यंदापासून पहिल्या दिवशी दुपारी चार वाजताच सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. कारण दुसऱ्या दिवशी सहभागी होत असल्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत नाही. यामुळे हा बदल केला आहे. भाविकांच्या भावनांचा विचार करून हा बदल करण्यात आला आहे.