पुणे, सिहोर : गुन्हेगारांना होणाऱ्या शिक्षेचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील अन् वाचले असतील. परंतु नुकताच मध्य प्रदेशातील न्यायालयाने दिलेला निकाल ऐकून आश्चर्य वाटेल. मध्य प्रदेशातील सिहोर जिल्हा न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपींना जबर बसणारी शिक्षा दिली आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तींमध्ये पुणे शहरातील व्यक्तीचाही समावेश आहे. एका आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी शिक्षा झाली आहे. अगदी शंभर, दोनशे वर्षांपेक्षाही जास्त शिक्षा झालीय.
काय आहे प्रकरण
न्यायालयाने शिक्षा दिलेले प्रकरण फसवणुकीचे आहे. साईप्रसाद कंपनीच्या संचालकानी चिंटफंड कंपनी सुरु केली. त्यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांमध्ये लोकांची फसवणूक केली. न्यायालयाने त्यांना 250 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
कोणाला झाली शिक्षा
चिटफंड प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव बाळासाहेब भापकर आहे. त्याला 250 वर्षांची शिक्षा झाली आहे. भापकर याच्यासह कंपनीचे सीहोर शाखेचे कर्मचारी दीपसिंग वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांनाही प्रत्येकी पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी ही शिक्षा दिली.
काय केले आरोपीने
आरोपी बाळासाहेब भापकर याने साई प्रसाद नावाने चिटफंड कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना पाच वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. यामुळे चांगल्या नफ्याच्या आमिषाने अनेकांनी चिटफंड कंपनीत पैसे गुंतवले. मात्र पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीला कुलूप लावून पळ काढला. या प्रकरणी 2016 मध्ये सीहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आता न्यायालयाने या कंपनीच्या संचालकाला 250 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
बाळासाहेब पुण्यातील रहिवाशी
चिटफंड कंपनीचे संचालक बाळासाहेब भापकर हे पुणे शहरातील रहिवासी आहेत. दीप सिंग वर्मा, राजेश उर्फ चेतनारायण परमार, लखन लाल वर्मा आणि जितेंद्र कुमार वर्मा यांच्यासोबत तो ही कंपनी चालवत होता. या प्रकरणी बाळासाहेब भापकर यांना 250 वर्षांची शिक्षा झाली आहे.