पुणे : अवकाळी पाऊस, नैसर्गिक संकटे अन् बाजारभाव या परिस्थितीत शेती करणे अवघड झाले आहे. शेती फायदेशीर उद्योग राहिला नाही, असे अनेक शेतकरी सांगतात. परंतु पुणे शहरात राहिलेल्या एका व्यक्तीने शेतीत ग्लोबल स्वारी केली आहे. पुण्यासह नऊ देशांत ते शेती करत आहेत. विशेष म्हणजे मुळात शेतकरी नसतांना त्यांनी शेती यशस्वी केली आहे. मुळात ‘मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट’ मधील पदवी असणाऱ्या व्यक्तीने लंडनमधील ‘आयटी’ क्षेत्रातील ‘कॉन्ट्रॅक्टिंग’ चा व्यवसाय सोडून शेती सुरु केली. आता तब्बल नऊ देशांत करार शेती करण्याचं दिव्य ते पार पाडत आहेत.
कोण आहे हा व्यक्ती
नीरज रत्तू (Neeraj Rattu) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या वडिलांची नोकरी पुणे शहरात होती. संरक्षण दलात त्यांचे वडील पुण्यात कार्यरत होते. त्यामुळे पुणे शहर त्यांना चांगलेच परिचित आहे. ते मुळात पंजाबामधील आहे. परंतु नीरज पुण्यातच वाढले. मराठी भाषा त्यांनी आपलीशी केली.
कशी निर्माण झाली आवड
‘मास्टर इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट’ मधील पदवी असताना नीरज रत्तू यांना शेतीची आवड निर्माण करण्यात एक प्रकल्प कारणीभूत ठरला. लंडनमध्ये त्यांना एका कंपनीकडून घाना देशात ‘मायक्रो फायनान्स’ विषयातील ‘सॉप्टवेअर’ विकसित करण्याचा प्रकल्प मिळाला. या प्रकल्पामुळे शेतीतील मशागत, लागवड ते काढणीपर्यंतचा सर्वाच गोष्टींचा त्यांचा सूक्ष्म अभ्यास झाला. त्यातून शेतीची आवड निर्माण झाली.
नऊ देशांत केली शेती
गेल्या पंधरा वर्षात नीरज यांनी अल्बेनिया, स्पेन, केनिया, युगांडा, घाना, मलावी, झांबिया, युगांडा, चिली या नऊ देशांत शेतीचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे भाजीपाला पिकांची करार शेती करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं. पुणे जिल्ह्यात रांजणगाव परिसरात पिंपरी दुमाला (ता. शिरूर) येथे ५० एकर जमीन ‘लीज’ वर घेत १० एकरांत मिरची घेतली आहे.
पहिला भाजीपाला घेणारा शेतकरी
युरोपातील अल्बेनियामध्ये भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय नीरज यांनी घेतला. या ठिकाणी शंभर एकर क्षेत्रात दुधी भोपळा, दोडका, कारले, गवार, टिंडा आणि वीस एकरांत भेंडी घेतली. अल्बेनियामध्ये असे करणारे ते पहिले भारतीय शेतकरी होते.
समस्यांवर केली मात
आफ्रिकी देशांत शेती जंगलात होती. त्याठिकाणी अनेकवेळ वीज नसायची. मग हवामान, भौगोलिकता, स्थानिक संस्कृती शिकून स्थानिकांना सोबत घेऊन व्यवस्थापन केलं. यावेळी भाषा हा मोठा अडथळा होता. मग त्या देशातील भाषा कामापुरती शिकून घेतली आणि शेती यशस्वी केली.
भारतातील शेती
पुणे जिल्ह्यातील पिंपरी दुमाला येथील शेतात पिवळ्या रंगाची भावनगरी, जी फोर वाणाची गडद काळी, चमकदार, तिखट मिरची आदी वाण घेतले आहेत. जी- फोर मिरचीचे एकरी १८ टनांपर्यंत तर भावनगरीचे २० टनांपर्यंत उत्पादन गेल्या वर्षी त्यांना मिळाले. यू ट्यूबवर शेतीविषयक व्हिडिओ पाहणे, नवे ज्ञान घेणे, ‘वीकएंड’ ला युरोपातील शेताला भेट देणं असा उद्योग ते सतत करत असतात.