पुणे | 9 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यास पुणेकर प्रतिसाद देत आहे. यामुळे पुणे मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न आता सुरु आहे. PMPMLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून बस सेवेत विविध बदल केले जात आहे. सूत्र घेतल्यानंतर त्यांनी आधी चालक आणि वाहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वत: बसमधून प्रवास करत कर्मचाऱ्यांना संदेश दिला. प्रयोगिक पातळीवर दोन विना कंडक्टर बसेस सुरु केल्या. आता सुपरफास्ट बसचा आनंद पुणेकरांना येणार आहे.
मेट्रोला जोडून फिडर सर्व्हिस सुरु केली आहे. त्यामुळे अनेकांचा वेळ वाचत आहे. आता बसने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. पुणे शहरात 200 मार्गांवर ‘नॉन-स्टॉप’ बसेस धावणार आहे. या बसेसमध्ये कंडक्टर नसणार आहे. यापूर्वी दोन मार्गांवर प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजाणी झाली होती. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 200 मार्गांवर ‘नॉन-स्टॉप’ बसेस सुरु केल्या जाणार आहे. त्यासाठी सर्व्हे केला गेला. लवकरच ही बस सेवा सुरु होणार आहे.
पीएमपीएमएल (PMPML) प्रशासनने घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. पीएमपीच्या नॉन-स्टॉप सेवेमुळे प्रवाशांचे 20 ते 25 मिनिटे वाचणार आहे. यामुळे फास्ट बस सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 200 मार्गांवर या बसेस धावणार आहे.
सध्या पुणे महानगरपालिका ते भोसरीपर्यंत नॉन-स्टॉप बस सेवा सुरु आहे. आता त्यासाठी 200 मार्गांची निवड केली गेली आहे. या बस सुरु होण्यापूर्वी चालकच प्रवाशांना तिकीट देणार आहे. या सेवेत वातानुकूलित बसचा वापर केला जाणार आहे. परंतु त्यामुळे तिकिटांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. जलद आणि चांगली सेवा प्रवाशांना मिळात असल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करत आहे. नवीन मार्गांवर सुरु होणाऱ्या नॉन स्टॉप बसेसला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.