अभिजित पोते, पुणे | 23 जुलै 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. मागील पंधरा दिवसांत दोन ते तीन वेळा कोम्बिंग ऑपरेशन पोलिसांनी राबवले. त्यानंतर अनेक गुन्हेगारांवर कारवाई झाली. काही जणांवर मकोका लावण्यात आला. कोयता गँगच्या मुसक्या आवरण्यासाठी कठोर कारवाई झाली. पोलिसांचे निलंबन आयुक्त रितेश कुमार यांनी केले. त्यानंतर गुन्हेगारी अटोक्यात येत नाही. आता तर चक्क पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे शहरात पुन्हा तोडफोड करत पोलिसांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर ही घटना घडली आहे. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे सराईत गुन्हेगार वैभव ईक्कर आणि त्याच्या साथीदाराने इंद्रप्रस्थ हॉटेलची तोडफोड केली.कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत बाटल्या फोडल्या. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर हॉटेलमधील पैसे लुटून नेले.
वैभव ईक्कर आणि त्याच्या साथीदार इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी हवेली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनाही मारहाण केलीय. त्यामुळे पोलिसांना मारहाण होत असेल तर सामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुण्यातील कात्रज पोलीस चौकीत यापूर्वी पोलिसांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. प्रीतम परदेशी अन् सुजाता परदेशी यांनी पोलीस ठाण्यात मोठमोठ्याने आरडाओरडा करत त्याठिकाणी असलेल्या ठाणे अंमलदार पोलिस हवालदार जाधव यांनी मारहाण केली होती. प्रीतम परदेशी याने पीएसआय नितीन तानाजी जाधव (वय ३२) यांना ‘आम्ही कोण आहे ते तुला दाखवितो, तुझी वर्दी उतरवितो, अशी धमकी दिली होती.