पुणे | 14 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा चौफेर विस्तार झाला आहे. यावेळी पुणे शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्यामुळे वैयक्तीक वाहने वापरण्यावर पुणेकर भर देतात. यामुळे देशात पुणे शहरात वाहने मोठ्या प्रमाणावर आहे. पुणे शहरात वाहनांची नोंदणी किती आहे आणि लोकसंख्या किती आहे, याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रत्येक पुणेकर किती वाहने वापरत असणार? हे ही लक्षात येते. मेट्रोच्या विस्तारामुळे पुणे शहरातील रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या कमी होणार का? हा एक प्रश्न आहे.
पुणे शहरात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. यामुळे आता पेट्रोल, डिझेलऐवजी ई-वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. पुणे महापालिकेतर्फे त्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी पुण्यात ई-रिक्षासाठी अनुदान वाटपचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नितीन शिंदे यांनी पुणे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असल्याचे म्हटले गेले.
पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले की, पुणे शहराची लोकसंख्या ७० लाखांपर्यंत पोचली आहे. परंतु पुणे शहरातील वाहनांची नोंदणी ५५ लाख झाली आहे. तसेच पुणे शहरात नोंदणी न झालेली अनेक वाहनेही आहेत. त्यामुळे पुणे शहरातील वाहनांची संख्या लोकसंख्येच्या बरोबरीने जाऊ शकते. यामुळे प्रत्येक पुणेकर दोन वाहने वापरत असल्याते दिसून येत आहे.
पुणे मेट्रोचे दोन टप्पे सुरु आहे. आता मेट्रोचा तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. तिसरा टप्पा सुरु झाल्यावर पुणे शहरातील प्रवाशांची संख्या चार लाखांवर जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच पुणेकरांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोचण्यासाठी ई-रिक्षा, सीएनजी रिक्षाचा वापर वाढवावा लागणार आहे. त्यानंतर पुणे शहरातील प्रदूषणाची पातळी कमी होईल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.