योगेश बोरसे, पुणे | 28 ऑगस्ट 2023 : पुणे शहरातील वाहतूक कोडींचा चर्चा नेहमीच होत असते. पुणे शहरात देशात सर्वाधिक वाहने आहेत. यामुळे रस्ते अपूर्ण ठरतात. वाहतूक कोंडी हा प्रश्न हा गंभीर झाला आहे. यामुळे पुण्यात आठ ते दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासभरचा वेळ लागतो. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे काम वेगाने सुरु आहे. पुण्यात 27 हजार कोटींचा रिंग रोड प्रकल्पास सुरुवात होणार आहे. हा रिंग रोड झाल्यावर काय होणार आहे, याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे शहरासाठी रिंग रोड प्रकल्पाचे काम आता सुरु होणार आहे. हा रिंगरोड 170 किलोमीटरचा आहे. या रिंगरोडचे काम पूर्ण झाल्यावर बाहेरील वाहने शहरात येणार नाही. अनेकांना पुणे शहरात येण्याची गरज पडणार नाही. यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मी पण शेतकरी आहे, कुणाची शेती किंवा घर जाऊ नये, अशीच माझी भूमिका आहे. परंतु सार्वजनिक प्रकल्पांसाठी जमिनीचे संपादन करणे गरजे आहे.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या समस्या सोडवण्यासाठी दर आठवड्याला बैठक घेण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला. अधिकाऱ्यांनी आपली कामे चोख करावी. त्यासाठी त्यांना कुणाला विचारण्याची गरज नसणार आहे, फक्त कामे झाली पाहिजे, अशी रोखठोक भूमिका अजित पवार यांनी मांडली. जर अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काही चुका केल्या तर त्यांची खैर नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी कुणाची गय केली जाणार नाही.
राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यामुळे निवडणुका लागल्या नाहीत, असे अजित पवार यांनी म्हटले. आपण आता याठिकाणी राजकीय विषयावर बोलणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.