पुणे | 2 सप्टेंबर 2023 : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) आदित्य एल-1 मिशनला शनिवारी प्रारंभ होणार आहे. भारताची ही सूर्यावर जाणारी पहिलीच मोहीम आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य एल-1 मिशन लॉन्चिंग करण्यात येणार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी त्या मोहिमेसाठी गेल्या दहा, बारा वर्षांपासून मेहनत घेतली आहे. आता भारतालाच नाही तर जगाला आदित्य एल-1 मिशनकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.
आदित्य एल 1 मिशनसाठी पुणे येथील इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड एस्टोफिजिक्स या संस्थेमध्ये काम करण्यात आले. या संस्थेतील शास्त्रज्ञांचा एक गट गेल्या दहा-बारा वर्षांपासून या मोहिमेवर काम करत आहे. आदित्य एल 1 साठी लागणाऱ्या पेलोडमध्ये सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलीस्कोप (SUIT) तयार करण्यासाठी पुणे येथील दुर्गेश त्रिपाठी आणि ए.एन. रामप्रकाश यांनी दहा वर्षांपासून काम करत आहे.
52 वर्षीय रामप्रकाश यांनी सांगितले की, “जो पर्यंत SUIT च्या माध्यमातून मिळणाऱ्या डेटाचे विश्लेषण होत नाही, तोपर्यंत आम्हाला चैन पडणार नाही. आम्हास हवा असणार डेटा SUIT कडून मिळाल्यानंतर आमची इतक्या वर्षांची मेहनत यशस्वी होणार आहे. SUIT जे नवीन विज्ञान तयार करणार आहे, ते आश्चर्य निर्माण करणारे असणार आहे.
SUIT चा उद्देश्य पराबँगनी रेंजमध्ये सूर्याची फोटोस्फीयर आणि क्रोमोस्फीयरची प्रतिमा करण्याचे आहे. या ठिकाणी तापमान 3,700 आणि 6,200 डिग्री सेल्सिअस असते. मणिपाल एकेडमी ऑफ हायर एजुकेशनचे सहायक प्रोफेसर श्रीजीत पदिनहत्तेरी यांनी म्हटले की, “आदित्यच्या लॉन्चिंगनंतर चार महिन्यानंतर तो प्वाइंट एल 1 पर्यंत पोहचणार आहे. त्यानंतर हेलो कक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर SUIT सह पेलोड सुरु करण्यात येणार आहे.
पुणे येथील 47 वर्षीय दुर्गेश त्रिपाठी, 2013 पासून SUIT वर काम करत आहे. इस्त्रोकडून सूर्यावर जाणारी ही पहिलीच मोहीम असल्यामुळे उपकरण करण्यास दीर्घ कालावधी लागला. तांत्रिकदृष्या हे खूप आव्हानात्मक होते. कोरोना काळात संथ गतीने काम झाले. त्यानंतर मात्र या कामाने चांगलाच वेग घेतल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.