पुणे | 15 सप्टेंबर 2023 : राज्यात १९ सप्टेंबरपासून गणेश उत्सव सुरु होत आहे. घराघरात आणि सार्वजनिक गणेश मंडळात गणरायाचे आगमन होणार आहे. त्यासाठी सर्वत्र तयारी सुरु आहे. भाविकांनी आपल्या घरी गणरायाची मूर्ती आणण्यासाठी बुकींग केले आहे. गणेशोत्सवाचा सर्वाधिक उत्साह देशात महाराष्ट्रात होतो. त्यातच पुणे आणि मुंबईतील गणेश उत्सव पाहण्यासाठी परदेशातील भाविक येतात. आता यंदा प्रथमच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी पुणे शहराचा संदर्भ आहे.
पुणे शहरातील गणेशोत्सव सातासमुद्रापार पोहोचला आहे. परंतु अजूनपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कधी सार्वजनिक गणेशोत्सव झालेला नव्हता. आता यंदा प्रथमच दीड दिवसांचा गणपती श्रीनगरमध्ये बसणार आहे. अगदी लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर हा गणेशोत्सव होणार आहे. श्रीनगरमध्ये श्रीच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करुन दीड दिवसानंतर त्याचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पुणे शहरातील सात गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे.
पुणे शहरातील सात गणेश मंडळानी घेतलेल्या पुढाकारामुळे यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार आहे. पुणे येथील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा हे मानाचे पाच गणपती तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ या सात मंडळांनी यासाठी प्रयत्न केले. श्रीनगर येथील गणपती उत्सवासाठी पुण्यातील कसबा गणपतीची प्रतिकृती तयार करण्यात आली. ही मूर्ती संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे सुपूर्द केली.
यंदा काश्मीरमध्ये गणेश उत्सावाचा उत्साह दिसत आहे. यामुळे काश्मीरात प्रथमच सार्वजिनक ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्याय येत आहे. यासाठी पुणे शहरातील गणेश मंडळांनी मदत केली आहे. यामुळे गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष प्रथमच काश्मीरमध्येही गुंजणार आहे. पुणे शहरात गणेश मंडळांनी गणरायाच्या स्वागताची तयारी जोरदार सुरु केली आहे. शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे देखावे पूर्ण करण्यावर भर देत आहे.