रणजित जाधव, पुणे : पुणे शहरात भरदिवसा सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. आधी पिस्तूलने गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे. या प्रकारानंतर पुणे शहरात खळबळ माजली आहे. हा हल्ला कोणी केली आणि त्याचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हल्ला करणारे चार जण असल्याचे म्हटले जात आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.
कोणावर झाला हल्ला
पिंपरी चिंचवड येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे. कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयासमोर अज्ञातांनी पावनेदोनच्या सुमारास त्यांच्यांवर प्राणघातक हल्ला केला. आधी त्यांच्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले गेले. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात कामानिमित्त आले होते.
चार जणांनी केला हल्ला
चार अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. हल्लेखोराचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोमाटणे टोलनाका टोलमुक्त व्हावा यासाठी किशोर आवारे हे सोमटाने टोलनाका हटाव कृती समितीच्या माध्यमातून लढा देत होते. त्याचा संदर्भ या हल्ल्याशी आहे का? हे तपासले जाणार आहे. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असल्याची टीका वारंवार केली जाते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेक वेळा हा मुद्दा उपस्थित केला होता. आता या प्रकरणामुळे पुन्हा गुन्हेगारी आणि पुण्यातील कोयत्या गँगचा विषय चर्चेला आला आहे.