पुणे | 14 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात अनेक ठिकाणी स्पा सेंटर सुरु झाले आहे. या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेगळाच प्रकार सुरु असतो. पुणे येथील पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा प्रकार समोर आणला आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राया आयुर्वेद स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलिसांनी सचिन रतन केदारी याला अटक केली. तसेच त्या ठिकाणावरुन दोन मुलींची सुटका केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरांत आर्थिक फायद्यासाठी तरुणींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडला जात असल्याचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे.
पुणे महापालिकेतील समाविष्ट 23 गावांच्या विकासासाठी महानगरपालिका कर्ज काढणार आहे. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनच्या कामासाठी वर्ल्ड बँकेकडून कर्ज काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी यासाठी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पुढील आठवड्यात जागतिक बँकेकडून अंतिम प्रस्ताव महापालिकेला सादर केला जाणार आहे. आराखड्यानुसार या कामांसाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
पुण्याच्या दुर्गम भागात असणाऱ्या पानशेत खोऱ्यातील शिरकोली गावात बिबटयाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात शेतकरी सुनील पांडुरंग मरगळे यांच्या तीन शेळ्यांचा मृत्यू झाला. मरगळे यांनी जंगलात चरण्यासाठी शेळ्या सोडल्या होत्या. परंतु या शेळ्या कळपात नसल्याने मरगळे यांनी शेळ्यांचा शोध सुरु केला. त्यांना तीन शेळ्या मृत अवस्थेत आढळल्या. तसेच एका शेळीचा मृतदेह झाडावर आढळून आला. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुण्याच्या भोर तालुक्यातील कासुर्डी गावात धाडसी घरफोडी झाली आहे. या घरफोडीत चार लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहे. कासुर्डी गावात राहणारे बाळासाहेब सोळाकुरे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घरात कुणी नसताना घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. कपाट फोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा चार लाखांचा माल लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरांट्यांविरोधात राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पुण्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात मोर्चा काढला. राज्य सरकारच्या शिक्षण आणि शिक्षक धोरणांच्या विरोधात शिक्षक कृती समितीकडून हा मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील शनिवार वाडा येथून मोर्चाला सुरुवात झाली. सरकारच्या आदेशाची होळी करत पुण्यातील शिक्षकांनी मोर्च्यास सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात बदल करणारे वेगवेगळे शासन आदेश काढून शिक्षण क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आरोप मोर्च्यात करण्यात आला.