पुणे : तुम्ही प्रेमकथेवरील अनेक हिंदी चित्रपट पाहिले असणार आहे. अगदी गद्दार एक प्रेम कथासारखा दोन देशांमधील प्रेमकथेचा चित्रपट पाहिला असणार. परंतु ही प्रेमकथा त्यापेक्षा वेगळी आहे. पुणे शहरातील एका तरुणास ऑनलाईनच्या माध्यमातून पाकिस्तानी हसीनाशी प्रेम झाले. मग हे प्रेम वाढत गेले. त्या युवकाने त्यासाठी दोन पाकिस्तानी दौरेही केले. मुस्लिम धर्मही स्वीकारला. परंतु या प्रेमकथेचा शेवट चित्रपटाप्रमाणे झाला नाही. अजूनही पुणे पोलीस त्या प्रेमकथेतील हसीनाचा शोध घेत आहे.
काय आहे कथा
2005 मध्ये पुण्यातील ‘विशाल’ या २५ वर्षीय विद्यार्थ्याने एका पाकिस्तानी तरुणीसोबत इंटरनेटच्या माध्यमातून चॅटिंग सुरू केली होती. मग हळूहळू दोघांमध्ये संवाद वाढला आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्षांनंतर, इंटरनेट चॅट्स, शेकडो फोन कॉल्स, पाकिस्तानच्या दोन सहली आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याचे वचन यातून सुरू झालेली प्रेमकहाणी कोणीही कल्पना केली नसेल अशा प्रकारे संपली.
दोन वर्षात झाली अटक
2007 मध्ये पुणे पोलिसांनी विशालला अटक केली होती. त्यानंतर त्यांना सात वर्षे तुरुंगात राहावे लागले. या घटनेला 16 वर्षे उलटून गेली आहेत पण पुणे पोलीस अजूनही आयएसआय एजंट सल्लुद्दीन शाह आणि त्याची मुलगी फातिमा यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी आता पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाचीही मदत मागितली आहे.
पुण्यात शिक्षणासाठी आला अन्
झारखंडमधील मध्यमवर्गीय कुटुंबातील विशाल 2004 साली पुणे शहरात शिक्षणासाठी आला होता. त्यावेळी तो हडपसरमधील कॉलेजमध्ये शिकत होता. 2005 मध्ये विशाल याहू मेसेंजरच्या माध्यमातून एका पाकिस्तानी मुलीच्या संपर्कात आला. तिने स्वत:ला ‘फातिमा सल्लुद्दीन शाह’ सांगितले होते अन् ती पाकिस्तानातील कराचीची रहिवासी होती.
रोज सुरु झाले चॅटींग
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा फातिमासोबत चॅट करण्यासाठी रोज एका इंटरनेट कॅफेमध्ये जात होता. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगत होत्या. विशाल फातिमाच्या प्रेमात वेडा झाला होता आणि त्याने त्याची आभासी मैत्रीण फातिमासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. फातिमाच्या वडिलांनी आधी या लग्नाला नकार दिला पण नंतर होकार दिला. मात्र, वडिलांनी अट घातली की, लग्नाआधी विशालला धर्म बदलावा लागेल. फातिमाचे वडील सल्लुद्दीन हे निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी होते.
काय म्हणतात पुणे पोलीस
या प्रकरणाचा तपास करणारे पुण्याचे माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे म्हणाले, “विशाल पाकिस्तानातून परतल्यावर त्याच्याकडे काही कागदपत्रे आणि काही सीडी आम्हाला मिळाली होती. ती कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती एका पाकिस्तानी एजंटला तो देणार होता. त्यामुळे आम्ही त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आणि 8 एप्रिल 2007 रोजी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक केली.
अनेक संशयास्पद छायाचित्रे
पोलिसांना विशालकडून अनेक संशयास्पद छायाचित्रे मिळाली होती. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (NDA) मध्येही तो गेला होता. तसेच लष्करी अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांकाच्या छायाप्रती, फातिमाचे छायाचित्र आणि सल्लुद्दीन शाह यांना उद्देशून लिहिलेला एक पत्र त्याच्याकडून जप्त करण्यात आला होते. तत्कालीन गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 120B (गुन्हेगारी कट) आणि कलमांखाली पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात विशालविरुद्ध एफआयआर नोंदवला.
दहशतवादी कारवायांसाठी घेतले प्रशिक्षण
विशालने पोलिसांना दिलेल्या जबाबात फातिमा आणि तिच्या कुटुंबियांना भेटणे, कराचीमध्ये त्यांच्या घरी राहणे, खरेदी करणे, हॉटेल आणि बागेत जाणे इत्यादी गोष्टी सांगितल्या. पाकिस्तानच्या दुसर्या भेटीदरम्यान, सल्लुद्दीन त्याला एका गुप्त ठिकाणी घेऊन गेला, जिथे त्याला दहशतवादी कारवायांसाठी लष्करी प्रशिक्षण देण्यात आले.
अन् स्वीकारला इस्लाम धर्म
विशालला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी पुणे आणि मालेगाव येथील काही मुस्लिम धर्मगुरूंशी संपर्क साधला होता. पुण्यातील एका मुस्लिम धर्मगुरूने फातिमाचे वडील सल्लुद्दीन यांच्याशी फोनवर बोलणेही केले होते. विशालने इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्याला ‘बिलाल’ नाव दिले गेले. पोलिसांनी ‘बिलाल’चा संदर्भ देणारा ईमेल रेकॉर्डही कोर्टात सादर केला. 29 मार्च 2011 रोजी न्यायालयाने त्याला सात वर्षांची शिक्षा दिला. त्यानंतर तो कारागृहातून सुटला.