मुंबई : पुणे शहरातील नागरिकांना मंत्रिमंडळाने मोठी भेट दिली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांची वर्षभरात ४० टक्के रक्कम वाचणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठक हा निर्णय घेण्यात आला. पुण्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या निर्णयामुळे पुणेकरांचा फायदा होणार आहे. तसेच यापूर्वी ज्यांनी कर भरला आहे, त्याची रक्कम आगामी बिलातून कमी करण्याचा निर्णय झाला आहे.
काय आहे निर्णय
पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास नागरिकांना घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत दिली आहे. पुणे शहरात यापूर्वी ही सवलत मिळत होती. ही सवलत पुन्हा सुरू करण्याबाबत पुणेकर नागरिकांनी मागणी केली होती. यामुळे मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानुसार आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भाड्यासाठी सवलत वाढवली
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून आता 15% सवलत मिळणार आहे. यापूर्वी ही सवलत 10% होती. परंतु मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी वापर असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना 40% सवलत देण्यास शासनाने मान्यता दिली.
ही होती मागणी
पुणे महानगरपालिकेने 28 ऑगस्ट, 2019 रोजी पुन्हा एक मुख्य सभा ठराव पारित करुन या सवलतीमुळे वसुली करावयाची थकबाकीची रक्कम पुर्वलक्षी प्रभावाने करु नये व 2019 पर्यंत ज्या पध्दतीने सवलत देण्यात येत होती ती तशीच यापुढेही सुरू राहावी अशी मागणी शासनाकडे केली होती. त्याअनुषंगाने 01 एप्रिल, 2023 पासून पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मालमत्ता कर आकारणी करतांना वार्षिक भाड्यातून 10% ऐवजी 15% सवलत आणि मालमत्ताधारक स्वत: राहण्यासाठी मालमत्तेचा वापर करत असल्यास त्यांना वार्षीक मालमत्ता करपात्र रक्कम निश्चित करतांना 40% सवलत लागू होणार आहे. तसेच 31 मार्च, 2023 पर्यंतच्या फरकाच्या रकमेची वसुली माफ करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
यांनाही मिळणार फायदा
सन 2019 ते 2023 या कालावधीत ज्या मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे त्यांच्या बाबतीत झालेल्या अधिकच्या कराची रक्कम पुढील देयकांमधून वळती करण्यात येणार आहे.
Good News : मुंबई- पुणे दरम्यान अंतर कमी करणारी बातमी, कधी सुरु होणार हा प्रकल्प
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अपघात टाळण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा, १६० कोटींचा कसा आहे प्रकल्प