योगेश बोरसे, पुणे : पुणे शहरातील वाघोली येथे गोडाऊनला भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहचल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु या आगीमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाला. दरम्यान ही आग कशामुळे लागली, हे कारण समजू शकले नाही.
कुठे लागली आग
पुणे शहरातील वाघोलीत शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता उबाळे नगर येथे आग लागली. “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाउनला भीषण आग लागली होती. या आगीत ४ सिलेंडर फुटले आहेत. आगीनंतर त्वरीत पुणे येथील अग्नीशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीए ४ अशी एकूण ९ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झाले.
तीन जणांचा मृत्यू
या भीषण आगीत दुर्देवाने तीन कामगारांचे मृतदेह आढळले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे. शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे पुढील धोका टळला आहे.
एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम केले. जवळच 400 सिलिंडरचा साठा असलेले गोदाम होते. त्या ठिकाणी आग पसरू नये म्हणून खबरदारी घेतली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
पिंपरी चिंचवडमध्ये आग
पिंपरी चिंचवडमध्ये खराळवाडी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाला रात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कागदपत्रे जळून खाक झाली असून दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.