रणजित जाधव, पिंपरी चिंचवड : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक म्हणजे मोठे दिव्यच असते. चार ते पाच किलोमीटर प्रवास करण्यासाठी अनेकदा तासभर वेळ जातो. चौकाचौकात असणारे सिग्नल आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अनेकवेळी सिग्नलवर बराच वेळ थांबावे लागते. अगदी समोर काहीच वाहने नसताना दुसरीकडे लाल सिग्नल असतो. यामुळे एका बाजूची वाहतूक खोळबंली जाते. त्यावर पुणे शहरातील स्टार्टअपने उपाय काढला आहे. यासाठी स्मार्ट सिग्नल प्रणाली बनवली आहे.
काय आहे प्रणाली
पिंपरीकडून हिंजवडीकडे जायचं म्हणजे एक दिव्य याची प्रचिती नेहमीच येते. या भागात आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. यामुळे या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा नेहमी सामना करावा लागतो. वाकडच्या मुख्य चौकात तर कितीतरी वेळा वाहतूक कोंडीचे चित्र दिसते. पण आता मात्र या चौकात सिग्नलच स्मार्ट झाले आहेत. या चौकात प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट इंटेलिजंट सिग्नल सिस्टीम बसवण्यात आली आहे. ही सिस्टीम कॅमेरा आणि सर्वांनी नियंत्रित होते. ज्या लेनवर गाड्यांची संख्या अधिक आहे ते सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व्हरला कळवले जाते. त्यानंतर सर्व्हेर सिग्नलचा कालावधी त्यानुसार बदलतो आणि वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होते.
ग्रीन कॅरोडोरची निर्मिती
स्मार्ट सिग्नल बनवताना रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचा विचार करण्यात आला आहे. म्हणजे रुग्णावाहिका आली तर सिग्नल त्वरीत ग्रीन होतो, रुग्णवाहिका गेल्यावर पुन्हा त्याचे पूर्वीप्रमाणे काम सुरु होते. या स्मार्ट सिग्नल यंत्रणेमुळे या चौकात ७० टक्क्यांहून अधिक सकारात्मक परिणाम दिसत आहे.
रियल टाईममध्ये व्यवस्थापन
रियल टाईममध्ये सिग्नल व्यवस्थापन केलं जातं. जिथं ट्राफिक जास्त तिथं सिग्नल जास्त वेळ खुला असतो. यामुळे वाहतूक कोंडी कमी होते. ७० ते ८० टक्के वाहतूक कोंडी कमी झाली आहे.