रणजित जाधव, पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील दोन मित्रांनी आपल्या दोघांनी एका मित्राबाबत केलेला प्रकार महिन्याभरानंतर उघड झाला आहे. देव दर्शनासाठी दोघांनी आपल्या मित्राला नेले. परंतु तो परत आला नाही. त्या मित्रांकडे कुटुंबियांकडून विचारणा होत होती. त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. त्यानंतर ते दोघे नॉट रिचेबल झाले. शेवटी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आता महिन्याभरानंतर या प्रकरणाची माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी दोघ मित्रांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुणे शहरातील रोहित नागवसे, गोरख फल्ले, सचिन यादव हे तिन मित्र होते. दोघांनी सचिनला निमगावला देवदर्शनासाठी जाऊ या, असे सांगत निमगावला नेले. 24 ऑगस्ट रोजी हे तिघे गेले. रोहित नागवसे आणि गोरख फल्ले यांनी सचिन यादव याला जंगलात मद्य पाजले. त्यानंतर सचिनच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. ही हत्या केल्यानंतर रोहित नागवसे आणि गोरख फल्ले फरार झाले. रोहित नागवसे हा मुंबईत तृतीयपंथी म्हणून वावरत पोलिसांची दिशाभूल करत होता तर दुसरा आरोपी गोरख फल्ले हा आपल्या बीड तालुक्यातील मूळ गावी जाऊन राहात होता.
सचिन यादव बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्यानंतर रोहित नागवसे, गोरख फल्ले यांचा शोध घेतला. परंतु ते मिळत नव्हते. त्यानंतर तांत्रिक तपास करत अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर त्यांचे लोकेशन मिळाले. त्या आरोपींना अटक केली. पोलीस खाक्या दाखवत त्यांनी तपास केला. पिंपरी- चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली.
रोहित नागवसे, गोरख फल्ले यांच्या डोक्यावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी मित्राला लुबाडण्याचे त्यांनी ठरवले. त्यावेळी दारूच्या नशेत त्याची हत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली आहे.