पुणे | 24 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पुण्यातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी,डेक्कन, पुलाची वाडी, शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला आहे. मंगळवारी पुणे येथून नाशिककडे अजित पवार जाणार होते. सकाळी सव्वा दहा वाजता ते नाशिकला जाणार होते. त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला. बोधीवृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. नाशिकनंतर अजित पवार यांचा अहमदनगर दौरा होणार होता.
मावळ तालुक्यात भात कापणीला वेग आला आहे. तसेच रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून वनराई बंधारे बांधण्याचे काम सुरु केले आहे. महागाव येथे कृषी विभागाच्या पुढाकाराने गावातील ओढ्यावर कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा साधारण चार तासांमध्ये ग्रामस्थांच्या श्रमदानातून बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे महागाव येथील 35 शेतकऱ्यांना रब्बी हंगाम पिकांसाठी व जनावरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. बंधाऱ्यामुळे 65 मीटर लांब पर्यंत पाणीसाठा साठवून राहणार आहे.
मावळमधील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात 26 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा नुकताच झाला. संत तुकाराम सहकारी साखर कारखानाचा 26 वा बॉयलर अग्नीप्रदीपन होता. आता कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. या साखर कारखान्याचे एकूण 22 हजार सदस्य आहेत. मागच्या वर्षी संत तुकाराम साखर कारखान्याची दिवाळी गोड झाली होती. 5 लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले होते.
रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आजपासून सुरु होत आहे. त्यासाठी शरद पवार पुण्यात सभा घेणार आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिराच्या बाहेर शरद पवार आणि रोहित पवार यांचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. टिळक स्मारक मंदिराच्या बाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहे.