पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : राज्यात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपासून राज्यातील सायबर पोलिसांकडे फसवणूक झाल्याच्या तक्रारी झपाट्याने वाढल्या आहेत. या फसवणूक प्रकरणात सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे उच्च शिक्षित लोकही अडकलेले आहेत. कधी ओटीपी घेऊन तर कधी मोबाईल हॅक करुन, कधी टास्ट देऊन फसवणूक केली जाते. आता या भामट्यांचा रडारवर आयएएस आणि आयपीएस अधिकारी आले आहेत. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा नावाचा वापर त्यासाठी केला गेला आहे.
पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याची बतावणी करुन फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावर फोन आला. त्यात आपण जिल्हाधिकारी राजेश देशमुख बोलत असल्याचे म्हटले. माझा माझा मित्र संतोषकुमार केंद्रीय सुरक्षा दलात आहे. परंतु त्याची बदली झाली आहे. यामुळे त्याचे जुने फर्निचर विकायचे आहे. स्वस्तात फर्निचर देणार असल्याचे आमिष दाखवून ७० हजार रुपये घेतले. परंतु फर्निचर मिळालेच नाही.
तक्रारदारने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली. या प्रकरणात एकूण सात जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण पोलिसांनी केले. तेव्हा हा प्रकार राजस्थानमधून घडल्याचे समोर आले. पुणे पोलीस राजस्थानला पोहचले. त्या ठिकाणावरुन शाहरूख काटुला खान (वय २३, अलवर, राजस्थान) याला अटक केली.
दरम्यान या प्रकरणानंतर आपल्या नावाचा वापर करुन फसवणूक होत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेला सावध केले आहे. या प्रकारच्या फोनवरुन येणाऱ्या संदेशाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी राजेश देशमुख यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते.