पुणे | 24 ऑगस्ट 2023 : जुलै महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे घाट परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाटाचा रस्ता वाहन धारकांसाठी बंद करण्यात आला होता. अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना ३० सप्टेंबरपर्यंत हा घाट पूर्णपणे बंद केला होता. आयएमडीकडून जेव्हा, जेव्हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट असेल तेव्हा सर्व प्रकारच्या वाहनांना या घाटावरुन वाहतूक बंद केली होती. आता या घाटावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
पुण्याहून भोरमार्गे कोकणात जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट 25 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे. हा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. या घाटात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याची भीती होती. यामुळे 30 सप्टेंबरपर्यंत घाट जड वाहनांसाठी तर हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना इतर वाहनानांसाठी बंद केला होता.
आता भारतीय हवामान खात्याकडून पावसासंदर्भात कोणताही अलर्ट दिला गेला नाही. यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुढील काळात हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाहतुकीबाबत सुधारित अधिसूचना काढण्यात येणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर पावसाळ्यात अतिवृष्टी होत असते. यामुळे अनेकवेळा अचानक दरडी कोसळतात. वृक्ष उन्मळून पडतात. कधी रस्तेही खचून जातात. माती वाहून जाते. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात वरंधा घाट बंद केला जातो. त्याऐवजी ताम्हिनी घाटाचा पर्याय दिला जातो. हा घाट वरंधा घाटापेक्षा अधिक सुरक्षित आहे. परंतु या मार्गे जाण्यास अधिक वेळ लागतो. यामुळे वाहन धारक वरंधा घाटाचा पर्याय निवडतात. कारण वेळ आणि इंधन दोघांची बचत या मार्गाने होते.