प्रदीप कापसे, पुणे | 6 ऑगस्ट 2023 : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांची काही दिवसांपूर्वीच विधास सभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. या निवडीनंतर प्रथमच त्यांनी पुणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना पुणे शहरातील काँग्रेसमधील गटबाजीचा अनुभव आला. पुणे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे यानिमित्ताने समोर आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात नाराजी असल्याचे समोर आले. त्यांच्या या दौऱ्यात नाराजीनाट्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यात येताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. विजय वडेट्टीवार पुणे काँग्रेस कार्यालयात जाणार होते. परंतु त्यांनी अचानक आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाण्याचे ठरले. त्यानंतर त्यांच्या गाडीत असलेले शहराध्यक्ष अरविंद शिंदे नाराज झाले. ते विजय वडेट्टीवार यांच्या गाडीतून उतरले अन् थेट काँग्रेस कार्यालयात आले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यासमोर धंगेकर गट आणि शिंदे गटातील गटबाजी समोर आली.
अजित पवार यांनी अमित शाह हे महाराष्ट्राचे जावाई असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांना घेरले. अजितदादा यांना पाच वर्षांपूर्वी अमित शाह महाराष्ट्राचे जावाई होते, हे माहीत नव्हते का? आता अजित पवार यांना हा जावाई शोध कसा लागला. अजित पवार सत्तेला सर्वोच्च मानतात. परंतु सत्तेला सर्वोच्च मानणाऱ्या नेत्यांना जनता बुडवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ते काँग्रेस नेत्या सोनिया गांधीं आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. सोमवारी दुपारी विजय वडेट्टीवार यांची सोनिया गांधी यांच्यासोबत भेट निश्चित झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दिल्लीत जाऊन ते सोनिया गांधी यांचे आभार मानणार आहेत. तसेच राहुल गांधी यांचे ते आभार मानणार आहेत.