पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला. त्यानंतर पक्षाला वेध लागले लोकसभा निवडणुकीचे. कसबा पेठ प्रमाणे कधीकाळी काँग्रेसचा गड असणारा पुणे लोकसभा मतदार संघ पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेसने मोर्चाबांधणी सुरु केलीय. खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या वर्चस्वाखालील असलेला लोकसभा मतदार संघात आता काँग्रेसचा गुलाल उधळण्याची तयारी सुरु झाली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमधून एक नाव जवळपास निश्चित झाले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनीच मागणी लावून धरली आहे.
भारतीय जनता पक्षासाठी महत्वाच्या असणाऱ्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजय झाले. भाजपसाठी हा मोठा धक्का होता. भाजप हा काँग्रेसचा विजय नव्हे तर रवींद्र धंगेकर यांचा विजय असल्याचे सांगत आहे. दुसरीकडे धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यानंतर काँग्रेससह मविआ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कार्यकर्त्यांमधील हा जोश कायम ठेवण्यासाठी वर्षभरावर आलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. यामुळेच पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना उमेदवार दिल्यास जागा जिंकता येईल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे. लोकसभेसाठी त्यांचे नाव निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे काँग्रेसचा गड
पुणे हा कधीकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड होता. शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व पुणेकरांनी मान्य केले होते. २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. महापालिका आणि विधानसभेतही या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्यांशिवाय पानही हालत नव्हते. मात्र नरेंद्र मोदी लाटेत परिस्थिती बदलली. आता पुन्हा रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी दिल्यास तेच दिवस येतील, अशी आशा कार्यकर्त्यांना आहे.
पुण्यात १९८० पासून सतत तीन वेळा काँग्रेसचे विठ्ठल नरहर गाडगीळ लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर भाजपचे अण्णा जोशी यांच्यानंतर काँग्रेसकडे ही जागा आली. काँग्रेसचे सुरेश कलमाडी १९९६ मध्ये निवडून आले. ते केंद्रात मंत्रीही झाले. ते ही तीन वेळा पुण्यातून खासदार होते. यामुळे रवींद्र धंगकर यांच्या माध्यमातून पुन्हा हा मतदार संघ काँग्रेसला मिळवता येईल, अशी चर्चा सुरु झाली आहे.