पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) पुणेकरांसाठी चांगली बातमी दिली आहे. आता तुमच्याकडे पाणी येत नसल्यास महानगरापालिकेच्या कार्यालयात जावे लागणार नाही. तसेच फोनवरुन तक्रार करण्यासाठी वेळेचे बंधन पाळावे लागणार नाही. पुणे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने 24 तास हेल्पलाईन सुरु केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कार्यक्षेत्रात पाणीपुरवठ्यासंदर्भात काही तक्रार असल्यास करता येणार आहे. मग तुमच्याकडे नियमित पाणी येत नाही, कमी दाबाने पाणी येते, परिसरातील पाइप डॅमेज झाला असले किंवा इतर कोणतीही समस्या असली तरी आता सहज सुटणार आहे.
काय आहे सेवा
पीएमसी प्रशासनाने (PMC Administration) 24 तास हेल्पलाईन सुरु केली आहे. यावरुन कधीही तुम्हाला तक्रार (Complaints) करता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्यावेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्यात नियमित पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिनीतून पाणी वाहून जाणे, जलवाहिनी डॅमेज होणे यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेत. त्यामुळे अनेक वेळा परिसरातील नागरिक रस्त्यांवर येऊन आंदोलनही करतात .
कोणत्या क्रमांकावर करावी तक्रार
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, मनपाने 24 तास हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. त्यात नागरिक आपल्या तक्रारी करु शकतात .020-25501383 या क्रमांकावर लोकांना तक्रारी करता येईल. दाखल झालेल्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन कारवाई केली जाईल. यामुळे या नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.
गुरुवारी पाणी पुरवठा बंद
येत्या गुरुवारी (2 मार्च) पुण्यातील काही परिसरात (water supply) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात फ्लो मीटर बसवण्याचे काम सुरु केले. रामटेकडी ते खराडी भागात जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे.
पुण्यातील ‘या’ भागात राहणार पाणी बंद
रामटेकडी, ससाणे नगर, हडपसर गावठाण, फुरसुंगी, सातव वाडी मगरपट्टा, वानवडी, केशवनगर मुंढवा गाव, गाडीतळ अशा मुख्य भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.