पुणे: कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून ठप्प असलेली पुण्यातील लसीकरण मोहीम बुधवारपासून पुन्हा सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून पुणे महानगरपालिकेला नुकतेच कोव्हिशिल्ड लसीचे 18 हजार डोस देण्यात आले. आज शहरातील आज 60 ठिकाणी कोव्हिशील्ड तर सहा ठिकाणी कोव्हॅक्सिनचे लसीकरण होईल.
महापालिकेची 200 केंद्र असल्याने प्रत्येक केंद्रावर 100 डोस द्यायचे असले तरी किमान 20 हजार डोसची आवश्यकता असते. पण महापालिकेला कोव्हिशील्डचे 18 हजार डोस मिळाल्याने लसीकरण केंद्रांची संख्या घटवली आहे. महापालिकेच्या 60 दवाखान्यांमध्ये कोव्हिशील्डचे प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून दिल्याने 12 हजार डोसचे वाटप करण्यात आले. उर्वरित सहा हजार डोस महापालिकेतर्फे विविध घटकांसाठी केल्या जाणाऱ्या लसीकरणासाठी वापरण्यात येतील.
गेल्या काही दिवसांमध्ये कडक निर्बंध लादूनही पुणे जिल्ह्यातील हॉटस्पॉट गावांची संख्या कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता या गावांमध्ये प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 42 गावांमध्ये कोरोनाचे (Coronavirus) रुग्ण वाढल्याने हे परिसर कोव्हिड हॉटस्पॉट झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावातील प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ग्रामीण भागाचा रुग्णबधितांचा दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे धडक सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हॉटस्पॉट गावे ही 100 च्या आत होती. मात्र, आता ती 109 वर पोहचली आहे. परिणामी ग्रामीण भागातील पॉझिटिव्हीटी रेट अद्याप पाच टक्क्यांच्या खाली आलेला नाही.
पुण्यातील शहरी भागात कोरोना संसर्गाचा टक्का घसरल्याचे समोर आले आहे. जुलैमध्ये महिन्यात सरासरी कोरोना प्रसाराचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी राहिला. फेब्रुवारी महिन्यात काही दिवस अशी स्थिती होती, पण त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने नवे उच्चांक प्रस्थापित केले.
जुलै महिन्यात शहरात कोरोनाच्या प्रसाराच्या दराबरोबरच मृत्यूच्या संख्येतही घट झाली. दुसऱ्या लाटेत ज्या वेगाने मृत्युदर आणि रुग्णसंख्या वाढली, त्याच वेगाने ती कमी झाली.
संबंधित बातम्या:
राज्याची चिंता वाढवणारी बातमी, पुण्यातील ‘या’ गावात डेल्टा प्लसचे 2 रुग्ण, आरोग्य यंत्रणा ॲलर्ट
पुण्यात तिसऱ्या लेव्हलचे कोरोना नियम, व्यापारी आक्रमक, “नियम बदला अन्यथा रस्त्यावर उतरणार”
तुळशीबाग मार्केटमध्ये पुणेकरांची तुफान गर्दी, कोरोना नियमांना हरताळ