पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी सकाळी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड जात होते. ही ओळख पटल्यानंतर ती दर्शना पवार हिचा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात पोलिसांकडून घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. मग डॉक्टरांचा आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालातून ही शक्यता खरी ठरली. त्यानंतर या सर्व प्रकरणात पोलिसांना संशय राहुल दत्तात्रय हांडोरे याच्यावर गेला अन् त्याचा शोध सुरु झाला. पाच पथके नियुक्त केली गेली. अखेरी तो मुंबईत सापडला.
राहुल हंडोरे यांने खून केल्यानंतर पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने वेगवेगळे प्रयोग केले. दर्शनाचा खून केल्यानंतर त्याने पुणे सोडले अन् सरळ सांगली गाठली. सांगली म्हणजेच महाराष्ट्रात थांबणे धोकादायक असल्याचे त्याला वाटू लागले. यामुळे मग त्याने गोवा गाठले. पुढे जाऊन चंदीगड अन् पश्चिम बंगाल असा प्रवास त्याने केला. या दरम्यान तो कुटुंबाचा संपर्कात येत होता. परंतु तो आपला मोबाइल सुरु करत नव्हता. यावेळी रेल्वेत किंवा इतर ठिकाणी दुसऱ्याकडून मोबाइल घेऊन तो कुटुंबियांना संपर्क करत होता. पोलिसांना आपला ट्रेस लागू नये हा त्याचा प्रयत्न होता.
राहुल हंडोरे दुसऱ्याचे मोबाइल घेऊन संपर्क करत असल्याचे पोलिसांनाही कळाले. मग ज्या नंबरवरुन राहुल कॉल करत होता, त्यावर पोलिसांनी कॉल करुन राहुल हंडोरे याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना राहुल यांचे अपडेट मिळू लागले. राहुल याचे पैसे संपले होते. त्यावेळी तो इतरांकडून मागून जेवण करत होता. मग पोलिसांना राहुल अंधेरीत येणार असल्याची माहिती मिळाली अन् ती संधी पोलिसांनी सोडली नाही. त्याच ठिकाणी त्याला पकडले.
राहुल याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची पोलीस कठोडी घेतली. न्यायालयाने २९ जूनपर्यंत त्याला कोठडी दिली. यामुळे पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे. त्याने खून कसा केला? खून केल्यानंतर तो कुठे गेला? दोघांचे प्रेमप्रकरण होते का? ही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. या खुनासंदर्भातील विविध पुरावे जमा करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.