पुणे | 28 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात दहशतवादी सापडल्याचा पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव आला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची मोठी तयारी केली होती. सात हजार पोलीस आणि १८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लक्ष होते. यामुळे पुणे शहरातील गणेशोत्सवातील दहा दिवस कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु या दरम्यान ठरवून दिलेल्या कामे योग्य पद्धतीने केले नाही, यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुणे पोलीस उपायुक्तांनी 73 पोलिसांवर मोठी कारवाई केली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी एकूण 73 पोलिसांवर केली आहे. तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. 47 पोलिसांची मुख्यालयात बदली केली आहे. तर 23 पोलिसांना प्रत्येकी 2,000 रुपये दंड केला आहे. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. गुरुवारी या पोलिसांनी नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी हे पोलीस उपस्थित नव्हते, यामुळे ही कारवाई केली गेली आहे.
पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाचे नियोजन केले होते. त्यावेळी हे पोलीस कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी आढळले नाही. या पोलीस कर्मचाऱ्यांवर गर्दीचे नियोजन आणि वाहतुकीचे नियोजन करण्याची जबाबदारी होती. ज्या ठिकाणी त्यांना हे काम दिले होते, त्या ठिकाणी ते गेले नाही. या पोलिसांनी वरिष्ठांना न कळवता उत्सवाच्या काळात आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी गेले नाही, यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांची यासंदर्भात चौकशी करण्यात आली. या चौकशीत ज्यांची उत्तरे असमाधानकारक नव्हती त्यांना दंड करण्यात आला. तीन जणांनी आपले कर्तव्य बजावले नाही, यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. पुणे शहरात गुरुवारी पाऊस होता. त्यावेळी रेनकोट परिधान करुन आपले कर्तव्य बजावण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांनी 28 जिल्ह्यातून 4,200 वाहतूक पोलीस कर्मचारी बोलवले होते. तसेच कंट्रोल रुमही तयार केले होते.