पुणे | 23 सप्टेंबर 2023 : पुणे शहरासह जिल्ह्यात अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात एकूण 63 ठिकाणी अपघाताचे ब्लॅक स्पॉट आढळून आले आहे. पुणे शहरातील नवले पूल, कात्रज चौक, खडीमशीन चौकासह वाकड, पिंपरी चिंचवडमध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यात एकूण ब्लॅक स्पॉट असून त्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पीएमआरडीए मिळून उपाययोजना करणार आहे. पुणे जिल्ह्यात अपघातांमध्ये 113 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेला दिले आहे.
पुण्याच्या वेल्हा तालुक्यात घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाबे घाटात दरड कोसळली आहे. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कोसळलेले झाड तोडून दोनचाकी वाहन जाण्यासाठी रस्ता खुला केला. घाटात आणखी काही ठिकाणी दरड कोसण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी घाटातून जाणे टाळवे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे येथील बार्टीकडून विद्यार्थ्यांसाठी नवीन 68 अभ्यासक्रम जाहीर केले आहे. कौशल्य विकास उपक्रमातंर्गत
बार्टीकडून विद्यार्थ्यांसाठी हे अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. विविध तंत्रज्ञानावर आधारित हे 68 अभ्यासक्रम शिकण्याची विद्यार्थ्यांना संधी असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळणार आहे.
पुणे शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाच नंतर बंद राहणार आहे. शनिवारपासून शहरातील प्रमुख रस्ते सायंकाळच्या सुमारास बंद असणार आहे. शनिवार आणि रविवारी गणपतीचे दर्शन आणि देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. शहरातील लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता तसेच या अंतर्गत येणारे रस्ते सायंकाळी बंद असणार आहे. 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबरपर्यंत रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील 16 गावांमधील कोतवालांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. रिक्त असलेल्या 16 जागांपैकी 80 टक्के म्हणजे 13 जागांची सरळसेवा पद्धतीने सोडत काढण्यात आली. भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी ही सोडत काढली.