Pune Rail : पुणे जिल्ह्यात होणार नवीन रेल्वे मार्ग, २५ वर्षांपासूनची मागणी पूर्ण

| Updated on: Sep 08, 2023 | 4:01 PM

Pune Rail : पुणे जिल्ह्यातील नागरिकांची गेल्या २५ वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. आता पुणेकरांना नवीन रेल्वे मार्ग मिळणार आहे. या मार्गासाठी निविदाही निघाली आहे. मार्गासाठी भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.

Pune Rail : पुणे जिल्ह्यात होणार नवीन रेल्वे मार्ग, २५ वर्षांपासूनची मागणी पूर्ण
Follow us on

पुणे | 8 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातून नाशिकला (Nashik- Pune) जाण्यासाठी रेल्वे मार्ग नाही. यामुळे या ठिकाणी सेमी हायस्पीड ट्रेन (Pune Nashik high Speed Train) सुरु करण्याची घोषणा झाली आहे. परंतु त्या मार्गाच्या हालचालींना काहीच वेग आला नाही. मात्र, आता पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित रेल्वे मार्गाचे काम सुरु होणार आहे. पुणेकरांची २५ वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. या मार्गासाठी निविदाही प्रसिद्ध झाली आहे. तसेच भूसंपादनाचे कामही ७८ टक्के पूर्ण झाले आहे.

कोणता रेल्वे मार्ग आता सुरु होणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गाव असणाऱ्या बारामतीमधून हा रेल्वे मार्ग सुरु होणार आहे. हा रेल्वेमार्ग बारामती-फलटण-लोणंद असा असणार आहे. रेल्वे मंत्रालयाने सन 1997-1998 च्या रेल्वे अर्थसंकल्पातच या मार्गाला मंजुरी दिली होती. परंतु काम अजूनही सुरु झाले नव्हते. रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या भूसंपादनाच्या कामाला वीस वर्षांचा काळ निघून गेला. आतापर्यंत फक्त फलटण-लोणंद हे भूसंपादन झाले आणि त्याठिकाणी रेल्वे मार्गही तयार झाला. परंतु बारामती-फलटण हे भूसंपादन अजूनही रखडले होते.

आता किती झाले भूसंपादन

बारामती-फलटण-लोणंद रेल्वेमार्ग प्रत्यक्षात उतरणार आहे. कारण या मार्गासाठी आता 78 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. आता येत्या दोन वर्षात हा रेल्वे मार्ग उभारण्याचे रेल्वे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. बारामती-फलटण-लोणंद या मार्गासाठी एकूण 600 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिध्द झाल्या. डिसेंबर 2025 पर्यंत हे काम संपविण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

कसा असणार मार्ग

बारामती ते फलटण हा 37 किलोमीटरचा रेल्वेमार्ग असणार आहे. या मार्गावर चार मोठे पूल असतील. तसेच 26 मेजर पूल असतील. 23 मायनर पूल आणि 7 आरओबी असणार आहेत. न्यू बारामती, माळवाडी आणि ढाकाळे ही नवीन रेल्वे स्थानके या मार्गावर तयार केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्युतीकरणासह हा एकेरी रेल्वेमार्ग सुरु होणार आहे. या मार्गामुळे पुणेकरांना आणखी एक सुविधा मिळणार आहे.