अभिजित पोते, पुणे : डिजिटलच्या युगात चोरटे डिजिटल झाले आहेत. सर्वसामान्य लोकांना रोज फसवले जात आहेत. राज्यात सायबर पोलिसांकडे रोज शेकडो फसवणुकीच्या तक्रारी येत आहेत. यामध्ये उच्च शिक्षितांची फसवणूक होत आहे. सायबर चोरटे फसवणुकीचे नवनवीन प्रकार शोधत आहेत. आता पुणे (pune crime news) जिल्हाधिकारींनाच सायबर ठगांचा फटका बसला आहे. पुणे जिल्हाधिकरींचे फेसबुकबर बनावट अकाऊंट तयार करण्यात आले आहे. “माही वर्मा” हिने हे अकाऊंट केलंय.
काय केले माही वर्माने
पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट माही वर्माने तयार केले. त्यात डॉ.देशमुख यांचा फोटो वापरला. आपण आयएएस अधिकारी असल्याचे त्यात म्हटले आहे. आपण मुंबईत राहत असल्याचे त्यात म्हटले आहे. फेसबुक बनावट अकाउंटचा फटका आता थेट पुणे जिल्हाधिकारींना बसला आहे. या प्रकारानंतर राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे.
कोण आहे माही वर्मा
सायबर चोरट्यांनी “माही वर्मा” या नावाने हे बनावट अकाउंट तयार केले आहे. त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा फोटो देखील पोस्ट करण्यात आले. या अकाउंटवरुन देशमुख यांच्या मूळ अकाउंटवरील अनेकांना “रिक्वेस्ट” पाठवण्यात आली आहे. ही माही आहे तरी कोण? जिल्हाधिकारींच्या फोटो वापरुन बनावट अकाउंट करण्याची त्यांनी हिंमत तरी कशी केली, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
यापूर्वी झाले होते बनावट अकाऊंट
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधी २ वेळा काही अज्ञातानी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा केले आहे. डॉ.राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसात याची तक्रार दिला आहे. यामुळे ही माही वर्मा नाव वापरणारी किंवा वापरणारा ठग कोण आहे? याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकरींचा फोटो वापरल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील झाले आहे. नागरिकांनी अशा बनावट अकाऊंटवर कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी पुन्हा केले आहे.
पोलिसांचे आवाहन
पोलिसांनी ऑनलाईन चोरट्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. लोकांनी अनोळखी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करुन नये, आपले ओटीपी व बँक खात्याची माहिती कोणाला देऊ नये, सोशल मीडियावर आपली वैयक्तीक माहिती देऊ नये, असे आवाहन केले आहे. तसेच बनावट अकाउंटवरील भूलथापांना बळी पडू नये, असे पोलिसांनी म्हटले आहे.