योगेश बोरसे, पुणे : गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील राजकारण अजित पवार अन् शरद पवार यांच्यावरच केंद्रित झाले आहे. कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांना कोणता झेंडा घेऊ हाती…हा प्रश्न पडला आहे. पुणे जिल्ह्यातील कार्यकर्ते संभ्रामात आहे. त्यात पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक तालुकाध्यक्षांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु गावागावातील जनता कोणासोबत आहे? याचा फेसला १३ जुलै रोजी होणार आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची तालुकाध्यक्षांची बैठक नुकतीच झाली होती. बैठकीला पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुकाध्यक्षांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाने दीपक मानकर यांची शहराध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
काका पुतण्यांमध्ये पुणे जिल्ह्यावर नेमकं कुणाचं वर्चस्व? १३ जुलै रोजी फैसला होणार आहे. शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. गुरुवारी जेजुरीत होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील १३८५ सरपंचांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामुळे यावेळी जिल्ह्यातील सरपंच शरद पवार यांच्या बाजूने की अजित पवार यांच्या बाजूने गुरुवारी स्पष्ट होणार आहे. त्यामाध्यमातून गावागावातील जनता कोणासोबत आहे, हे निश्चित होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी उपक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या उपक्रमास आतापर्यंत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहत होती. आता अजित पवारसुद्धा या कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. जेजुरीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत. यावेळी हे नेते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.