पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : पुणे येथील ससून हॉस्पिटलमधील ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच उघड झाले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे प्रकरण उघड केले. परंतु त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला. त्यानंतर पुणे पोलिसांवर चौफेर टीका होऊ लागली आहे. यामुळे राज्य शासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमली. तसेच पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला आहे. पुणे, मुंबई, नाशिक पोलीस एकाच वेळी ललित पाटील याचा देशभर शोध घेत होते. त्यावेळी भूषण पाटील याला अटक करण्यात आली.
भूषण पाटील हाच ड्रग्स प्रकरणातील प्रमुख सूत्रधार आहे. तो केमिकल इंजिनीअर आहे. त्यामुळे त्याला रसायनशास्त्राचे चांगलेच ज्ञान होते. यामुळे तोच एमडी ड्रग्स तयार करत होता. त्याला नाशिक येथील आणि सध्या ड्रग्स प्रकरणात कारागृहात असलेल्या अरविंदकुमार लोहारे याने एमडी ड्रग्स बनवण्याचे प्रशिक्षण दिले होते. ड्रग्स तयार करण्याचे काम भूषण पाटील करत होते तर ते ड्रग्स विकण्याचे काम ललित पाटील करत होता. तसेच अभिषेक बलकवडे हा आर्थिक व्यवहार पाहत होता.
भारतात एमडी ड्रग्स विदेशातून येते. परंतु रसायन शास्त्राची माहिती असलेल्या भूषण पाटील याच्याकडे ड्रग्स बनवण्यासाठी एक टीम होती. भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना १० ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती तर १८ ऑक्टोबर रोजी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली.
पुणे येथील फरार झाल्यानंतर ललित पाटील आधी चाळीसगावात दाखल झाला. त्यानंतर धुळ्याला पोहचत भाड्याने वाहन घेतले. तेथून छत्रपतीसंभाजीनगर मार्गे गुजरातमधील जामनगर येथे गेला. त्यानंतर सोलापूर येथे दाखल झाला. पुढे विजापूरवरुन कर्नाटक गाठले. कर्नाटकातून चेन्नईला जाण्याचा त्याचा बेत होता. चेन्नईवरुन तो श्रीलंकेत दाखल होणार होता. परंतु त्यापूर्वी मुंबई पोलिसांना तो मिळाला.