पुणे | 4 सप्टेंबर 2023 : पुणे शहराकडे अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) लक्ष गेल्या काही दिवसांपासून आहे. पुणे शहरात ईडीने यापूर्वी अनेक वेळा छापे टाकले होते. आता पुणे शहराशी संबंधित कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. या कंपनीच्या नऊ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या कंपनीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील मालमत्ता सील केल्या आहेत. त्यामुळे खळबळ माजली आहे.
पुणे येथील कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. यासंदर्भात ईडीने पत्रक काढून माहिती दिली आहे. पुणे येथील वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड (M/s VHPL) ही कंपनी आणि त्याची उपकंपनी व्हिओएलच्या एकूण नऊ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. सुमारे 65 कोटी 53 लाख रुपयांच्या या मालमत्ता आहेत.
अंमलबजावणी संचालनालयाने 2011 पासून वेंकटेश्वरा हॅचरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची आणि युनायटेड किंगडम या त्याच्या उपकंपनीची चौकशी सुरु केली होती. या प्रकरणाच्या तपासातून मेसर्स व्हीएचपीएलने मेसर्स व्हीओएलचा व्यवसायात गैरप्रकार आढळून आला. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले.
व्हीओएल कंपनीला इक्विटी इन्फ्युजनच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी मुळ कंपनीतून पाठवला गेला. परंतु कंपनीतून कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्शन सुरु झाले नाही. यामुळे एकूण 65 कोटी 53 रुपयांचा व्यवहार यामध्ये झाला होता. व्हीएचपीएल या कंपनीने पाठवलेल्या निधीतून युनायटेड किंगडमने “अलेक्झांडर हाऊस” नावाची स्थावर मालमत्ता खरेदी केली. व्हिएचपीएल कंपनीने पाठवलेला पैसा व्हिओएल कंपनीने युकेमधील मिळालेले कर्ज फेडण्यासाठी केला.
पुणे परिसरात असलेल्या पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेसंदर्भात ईडीने मोठी कारवाई केली होती. या बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. मूलचंदानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केले होते. सुमारे 450 कोटींचा हा घोटाळा होता. या प्रकरणी मूलचंदानी आणि इतर काही जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई झाली आहे.