पुणे | 2 सप्टेंबर 2023 : उद्योजकाकडे वीज बिलाची मोठी थकबाकी होती. मग थकबाकी न भरता वीज घेण्याची शक्कल उद्योजकाने लढवली. उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून आपल्या कारखान्यातील वीज पुरवठा सुरु केला. या माध्यातून कोट्यावधी रुपयांची वीज चोरी केली. अखेर हा प्रकार महावितरणच्या अधिकाऱ्यांना समजला. उद्योजकाने कारखान्यावर बंदोबस्त ठेवला होता. मग अधिकाऱ्यांनी त्याचे पुढे पाऊल टाकून प्रथमच वेगळ्या पद्धतीने त्याची वीज चोरी उघड केली. या प्रकरणी उद्योजकाला दंड करण्यात आला असून गुन्हाही दाखल केला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांच्या मालकीच्या तीन कंपन्या आहेत. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. आणि प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि. या दोन कंपन्यांमध्ये उच्चदाब क्षमतेची वीज जोडणी दिली होती. तर त्यांची तिसरी कंपनी भगवान ट्यूब प्रा.लि. या ठिकाणी लघुदाब प्रकारातून वीज दिलेली होती. परंतु त्यांच्याकडे वीजेची मोठी थकबाकी झाली होती. त्यामुळे भगवान ट्यूब कंपनीचा वीजपुरवठा कायम स्वरूपी बंद केला होता, तर इतर दोन कंपन्यांचा वीजपुरवठा तात्पुरता बंद केला होता.
वीजपुरवठा बंद झाल्यामुळे उद्योजकाने नवीन शक्कल लढवत वीज चोरी सुरु केली. त्याने उच्चदाबाच्या रोहित्राला थेट जोडून वीजचोरी केली. ही माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. परंतु मुकेश अगरवाल यांनी आपल्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे पुराव्याशिवाय छाप टाकून वीज चोरी पकडणे शक्य नव्हते.
केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना वीजचोरीची माहिती मिळाली. उद्योजकाने गेटवर बंदोबस्त ठेवला होता. यामुळे या कंपनीतील वीजचोरी उघड करण्यासाठी प्रथमच ड्रोनची मदत घेण्याचा निर्णय घेतला. ड्रोनने चित्रिकरण केले. त्यानंतर कुरिअर आल्याचे सांगून कंपनीत प्रवेश मिळवला आणि वीजचोरीचा पर्दाफाश केला.
प्रकाश करुगेटेड कंपनीत 4 लाख 73 हजार 290 युनिटची वीज चोरी झाली. त्याची किंमत 1 कोटी 11 लाख 19 हजार 857 रुपये होती. थर्मोलाईट पॅकेजिंग कंपनीत 2 लाख 5 हजार 606 युनिट म्हणजेच 51 लाख 34 हजार रुपयांची चोरी झाली. तर भगवान ट्यूब कंपनीत 2 लाख 34 हजार 961 युनिट म्हणजे 42 लाख 25 हजार रुपयांची चोरी झाली. चोरीची एकूण रक्कम 2 कोटी 4 लाख 79 हजार रुपये होती. या प्रकरणी मुकेश अगरवाल यांना दंड करण्यात आला असून वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.