पिंपरी चिंचवडमध्ये छातीपर्यंत दलदलीत अडकलेल्या आजोबांच्या सुटकेचा थरार, पाहा VIDEO

| Updated on: Jul 21, 2023 | 7:52 PM

पिंपरी चिंचवडमध्ये एक 72 वर्षीय आजोबा दलदलीत अडकले होते. ते छातीपर्यंत दलदलीत अडकले होते. पण सुदैवाने या आजोबांचे प्राण वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये छातीपर्यंत दलदलीत अडकलेल्या आजोबांच्या सुटकेचा थरार, पाहा VIDEO
Follow us on

पुणे | 21 जुलै 2023 : आपण बऱ्याचदा शॉर्टकट रस्त्याचा विचार करतो. जास्त लांबच्या रस्त्याने जाण्यापेक्षा एखादा शॉर्ट रस्ता मिळाला तर आपला वेळ वाचेल, असा आपण विचार करतो. पण नेमकं कोणत्या शॉर्टकट रस्त्याने जावं हे आपण ठरवलं पाहिजे. एखादा शॉर्टकट रस्ता हा अडचणीचा असेल तर त्या रस्त्याने जाण्यापेक्षा आपण जो मुख्य रस्ता आहे त्यानेच जाणं जास्त चांगलं ठरतं. हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आज पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेली एक घटना. या घटनेत 72 वर्षीय आजोबांना वाचवण्याच अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. पण या आजोबांची आरडोओरड कुणाला ऐकू आली नसती तर आजोबांना वाचवता आलं नसतं. आजोबांचा जीव वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांचं देखील मोठं योगदान आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथे दलदलीत फसलेल्या ज्येष्ठ नागरिकाला बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. 72 वर्षीय आजोबा त्यांच्या नातवाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते नातवाला शाळेत सोडून आल्यानंतर घराकडे निघाले होते. या दरम्यान संबंधित घटना घडली.

हे सुद्धा वाचा

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ज्यांच्यासोबत घडली त्या 72 वर्षीय आजोबांचं नीलकंठ पाटील असं नाव आहे. ते त्यांच्या नातवाला शाळेत सोडवण्यासाठी गेले होते. नातवाला सोडून नेहमीच्या रस्त्याने येण्याऐवजी ते दुसऱ्या मैदानावरून शॉर्टकट येत होते. या दरम्यान मैदानाच्या मध्यभागी दलदलीत ते अडकले. त्यांना सुरुवातीला पावसामुळे चिखल असल्याचं वाटलं. नंतर ते दलदलीत अडकले, याची त्यांना खात्री पटली.

नीलकंठ पाटील आजोबा दलदलीत खाली फसत जात होते. ते स्वत:ला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. पण ते स्वत:ला दलदलीतून बाहेर काढू शकत नव्हते. परिस्थिती इतकी बिकट झाली की ते छातीपर्यंत दलदलीत रुतले. त्यामुळे मोठ्या अडचणीत सापडले.

…आणि आजोबांचा जीव वाचला

नीलकंठ पाटील यांनी जीव वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून जवळच असलेल्या व्यक्तीने तात्काळ त्यांच्याकडे धाव घेतली. या व्यक्तीने अग्निशमन विभागाला तात्काळ कळवलं. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्य सुरु केलं.


अग्निशमन दलाच्या जवानांनी सीडी आणि इतर साहित्याच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक निळकंठ यांना सुखरूप बाहेर काढलं. निळकंठ यांच्या जीवावर शॉर्टकट बेतला असता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, याचा प्रत्येय घटनेतून आला आहे.