पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाले. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक यंदाही विक्रमी वेळेत पूर्ण होणार आहे. तब्बल २४ तास झाल्यानंतरही मिरवणूक सुरु होती. मिरवणुकीत लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावर डीजेचा दणदणाट नेहमीच असतो. यंदाही आवाजाची पातळी जास्त होती. यामुळे या भागांत राहणाऱ्या अनेकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास झाला. पुणे शहरात वायू प्रदूषण सर्वाधिक असताना आता उत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण वाढत आहे.
पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक गुरुवारी दहा वाजता सुरु झाली. तेव्हापासून पुण्यातील रस्त्यांवर डीजेच्या दणदणाट सुरु झाला. डीजेच्या आवाजाची मर्यादा गुरुवारी ओलांडली गेल्याचे चित्र दिसले. गुरुवारी संध्याकाळी लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावर 100 डेसिबलपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवला गेला. यामुळे अनेकांचा थरकाप उडत होता. डीजेच्या या आवाजाचा त्रास लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना होत होता. गुरुवारी रात्री 12 वाजेपर्यंत हा दणदाणाट सुरु होता. त्यानंतर तो थांबला. पुन्हा शुक्रवारी सकाळी हा आवाज सुरु झाला. विसर्जन मिरवणूक संपल्यावर डीजेचा आवाज थांबणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत गेल्या वर्षी 105.2 डेसिबल आवाज नोंदवला गेला. यंदा हा आवाज 100 डेसिबल होता. परंतु 2021 मध्ये 59.8 डेसिबल एवढी ध्वनीपातळी नोंदवली गेली होती. यापूर्वी 2013 मध्ये तब्बल 109.3 डेसिबल आवाजाची पातळी नोंदवली गेली होती. 2020 आणि 2021 मध्ये कोरोना काळ होता. त्यामुळे विसर्जन मिरवणूक मर्यादीत होती. त्यावेळी अनुक्रमे 59.8 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती.