पुणे | 30 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीचा विक्रम झाला. तब्बल २९ तासांपेक्षा जास्त काळ विसर्जन मिरवणूक चालली. विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोड आणि टिळक रस्त्यावर डीजेचा जोरदार दणदणाट होता. पुणे शहरातील विसर्जन निवडणुकीच्या मार्गावरील रस्त्यांवर मर्यादेपेक्षा जास्त आवाजाची पातळी होती. अनेक रस्त्यांवर शंभर डेसिबलपेक्षा जास्त आवाज होता. यामुळे या भागांत राहणाऱ्या अनेकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास झाला. पुणे शहरात वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असताना उत्सवात ध्वनी प्रदूषण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी पातळी सर्वत्र शंभर डेसिबलपेक्षा जास्त राहिली. हा आवाज सर्वसामान्यांना असह्य झाला होता. पुणे शहरातील खंडुजीबाबा चौकात सर्वाधिक आवाज नोंदवला गेला. शुक्रवारी रात्री आठ वाजता या ठिकाणी १२९.८ डेसिबल आवाजाची नोंद झाली. पुणे येथील सीओईपी महाविद्यालाकडून ही आवाजाची पातळी नोंदवली गेली. महाविद्यालयाकडून मुख्य मिरवणुकीदरम्यान २८ आणि २९ सप्टेंबर दर चार तासांनी निरीक्षणे नोंदवली.
पुण्यातील बेलबाग चौकात ११९ डेसिबल आवाज नोंदवला गेला. गणपती चौकात ११६.४ तर कुंटे चौकात ११८.९ डेसिबल ध्वनी प्रदूषण राहिले. उंबऱ्या चौकात ११९.८ तर गोखले ११७.३ डेसिबल आवाज नोंदवला गेला. गोखले चौकात ११७, टिळक चौकात ११७ तर खंडुजीबाबा चौकात १२९.८ डेसिबल आवाज नोंदवला गेला.
आवाजाची पातळी किती हवी, यासंदर्भात मर्यादा ठरलेली आहे. औद्योगिक क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबलपर्यंत आवाज हवा. वाणिज्य क्षेत्रात ही मर्यादा दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबल आहे. परंतु निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल आवाज हवा. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत निवासी क्षेत्रात दुप्पटीपेक्षा जास्त आवाज होता. त्याचा त्रास या भागातील रहिवाशांना सर्वाधिक झाला. शांतता क्षेत्रात आवाजाची मर्यादा दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबल्स ठरवून दिली आहे.