पुणे | 29 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाले. तसेच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले. परंतु पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक २३ तासांनंतरही सुरु आहे. या मिरवणुकीत कसबा पेठेतील गणेश मंडळाने एक बॅनर झळकवले आहे. त्यात “आई भवानी शक्ती दे, पुण्येश्वरला मुक्ती दे” असे लिहिले आहे. पुणे शहरात मागील काही दिवसांपासून पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा गाजत आहे. मंदिराच्या जागेत अनधिकृत बांधकाम झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्येश्वर मंदिराच्या मुद्याकडे मंडळाने लक्ष वेधले आहे.
मावळच्या तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेमध्ये पाच हजारांची लाच घेतल्या प्रकरणी लेखापालास लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. तळेगाव नगरपरिषदमध्ये लेखपाल असलेल्या नरेंद्र अनंतराव कणसे याला लाच घेता पकडले. तळेगाव दाभाडे येथील स्मशानभूमीचा गॅस शव दाहिनीचा ठेका एका कॉन्ट्रॅक्टरला मिळाला आहे. तसेच कोव्हिडच्या काळात सॅनिटायझर फवारणीचा ठेकाही त्यांनाच मिळाला होता. हे दोन्ही बिल नगरपरिषदेकडे प्रलंबित होते. ते बिल मंजूरसाठी कणसे याने ठेकेदाराकडे एक टक्का रकमेची मागणी केली होती. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी बारामतीत पोहचले. त्यानंतर बारामतीमधील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध संस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे दिवसभरात शरद पवार बारामतीत असणार असून त्यानंतर ते पुणे शहराकडे रवाना होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सत्र परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शैक्षणिक वेळापत्रक पूर्ववत करण्यासाठी यंदाही सलग पद्धतीने पेपर घेतले जाणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.
पुण्याच्या खेड तालुक्यातील शिरोली पाईट रोडवरील ओढ्याला पूर आला आहे. या पुरातून दुचाकीस्वार गाडी काढत असताना ओढ्याच्या मध्यावर पाण्याचा जोर वाढला. त्यावेळी दुचाकीसह तरुण वाहून जाणार असताना स्थानिक तरुणांनी साखळी करुन दुचाकीसह तरुणास वाचवले. स्थानिक तरुणांनी वाचवले नसते तर त्या तरुणाचे हे धाडस अंगलट आले असते.