अभिजित पोते. पुणे | 17 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. गणेश मंडळांचे आरास तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घराघरात गणरायाच्या आगमनाची तयारी केली जात आहे. त्याचवेळी हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. पुणे पोलिसांनी यासंदर्भात सूक्ष्म नियोजन केले आहे. हजारो पोलीस कर्मचाऱ्यांसोबत तंत्रज्ञानाचा वापर करुन २४ तास शहरातील महत्वाचे भाग पोलिसांच्या निगराणीत राहणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त पुणे शहरात पोलिसांची तयारी काय? यासंदर्भात बोलताना सहायक पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले की, मागील दोन महिन्यांपासून पोलिसांनी गणेशोत्सवासाठी तयारी सुरू केली आहे. बंदोबस्तासाठी पूर्ण नियोजन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांची नजर सर्वत्र राहणार आहे. त्यासाठी 7000 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुणे शहरात सुरक्षिततेसाठी स्पेशल फोर्सेस देखील पुण्यामध्ये तैनात असणार आहे.
पुणे शहराची तपासणी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून वारंवार करण्यात येणार आहे. दिवसभर शहरातील विविध भागावर या पथकाचे लक्ष असणार आहे. शहरात १ हजार ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जणार आहे. सीआरपीएफच्या पाच तुकड्या गणेशोत्सवात पुणे शहरात असणार आहे. तसेच साध्या वेशातील पोलिसांच्या तुकड्यांचे लक्ष असणार आहे. क्यूआरटी पथकाचा वापर करण्यात येणार आहे. एक हजार होम गार्ड आणि पोलीस मित्र पुणेकरांच्या सुरक्षेसाठी असणार आहे.
१९ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. यामुळे पुणे शहरातील गणेश मूर्ती कार्यशाळेत मूर्तीकारांची लगबग सुरू आहे. मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. गणेश मूर्ती कार्यशाळेत बाप्पांच्या अनेक मूर्त्या बनून तयार झाल्या आहेत. वेगवेगळ्या रूपातील बाप्पांच्या मूर्त्या भाविकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. रविवारचे निमित्त साधून भाविक पुजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची खरेदी करत आहे.