योगेश बोरसे, पुणे : राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत आहे, अशी टीका वारंवार होत असते. आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीला चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश दिला गेला आहे. स्वाती मोहोळ भाजपमध्ये प्रवेश करणार यासंदर्भात चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात मोजक्या शब्दांत आपले मत मांडले आहे.
पुणे बँक प्रथम
अजित पवार यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले की, सर्व निकषांमध्ये पुणे जिल्हा सहकारी बँक राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेला 2022-23 मध्ये 351 कोटी 39 लाखांचा ढोबळ नफा झाला आहे. बँकेचा ढोबळ एनपीए 4.51 टक्के आहे. बँक 8 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. विदेशात शिक्षण घेण्यासाठी 40 लाखांपर्यंत आणि देशात शिक्षणासाठी 30 लाखापर्यंत 6 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे.
बड्या लोकांना कर्ज माफ
मावळमधील शेतकऱ्यांना चिक्की उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहकारी बँकाबद्दल रिझर्व्ह बँकेकडून दूजाभाव केला जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. आरबीआयने खासगी तसेच राष्ट्रीयीकृत बँकाना मोकळीक दिली आहे. त्यांनी बड्या लोकांना दिलेली11 लाख 10 हजार कोटींची कर्जे माफ केली जातात. सहकारी बँकांना मात्र कठोर नियम लावले जातात.
यामुळे बैठकीला गैरहजर
पक्षाच्या बैठकीत अजित पवार नव्हते, त्याची चर्चा सुरु झाली. त्यावर बोलताना ते म्हणाले, माझ्या बाबतीत शंका कुशंका डोक्यातून काढा. माझा कार्यक्रम आधीपासून ठरला होता. त्यामुळे बैठकीला नव्हतो.
खारगर घटनेची जबाबदारी सरकारची
खारगरमधील घटनेची जबाबदारी सरकारची आहे. कारण सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला होता. खारघरमधील दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत सरकारने दिलेल्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी राज्यपालांकडे केलीय, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश
शरद मोहोळ यांच्या पत्नीस भाजपमध्ये प्रवेश दिल्याबद्दल अजित पवार म्हणाले, हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे. पण जनतेने राज्यकर्ते कुठल्या स्तराला चाललेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. माझ्याकडून मागे एक चूक झाली होती, ती मी सुधारली. चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी काही विचार केला असावा.
हे ही वाचा
राजकारणात चर्चा तर होणारच, पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत गँगस्टराची पत्नी भाजपमध्ये दाखल