सरकारी कर्मचाऱ्यांचे ‘वजन’ होणार कमी? काय सुरु केला उपक्रम

| Updated on: Jun 30, 2023 | 11:55 AM

Pune News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकार अनेक उपक्रम राबवत असते. आता कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी एक अभियान सुरु केले आहे. त्या अभियानानंतर किती कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा झाला, हे स्पष्ट होणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचे वजन होणार कमी? काय सुरु केला उपक्रम
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अभिजित पोते, पुणे : सरकारी नोकरी अनेक तरुणांचे स्वप्न असते. कारण सरकारी नोकरीत सुरक्षा असते, सन्मानजनक पैसा सरकारी नोकरीत मिळत असतो, भरपूर सुट्याही मिळतात अन् वैद्यकीय उपचारासाठी योजनाही असते. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. सरकारच्या या उपक्रमास पुणे शहरातून प्रथम प्रतिसाद मिळाला आहे. पुणे शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु झाल्या आहे.

काय आहे उपक्रम

सरकारी कर्मचाऱ्यांचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी स्थूलत्व उपचार व प्रतिबंध अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे वजन कमी करुन त्यांचा लठ्ठपणा कमी केला जाणार आहे.

किती जणांची तपासणी

स्थूलत्व उपचार व प्रतिबंध अभियान अंतर्गत पुणे शहरातील १६० सरकारी कर्मचाऱ्यांची स्थूलता तपासण्यात आली. राज्य सरकारच्या स्थूलत्व जनजागृती अन् प्रतिबंध अभियानांतर्गत ससून रुग्णालयाने हे पाऊल उचलले आहे.

हे सुद्धा वाचा

कोणत्या विभागांमध्ये झाली तपासणी

मुख्य टपाल कार्यालय, समाज कल्याण आयुक्त कार्यालय आणि शासकीय फोटोझिंको मुद्रणालय या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तपासणी झाली. सर्वच सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्थूलत्व तपासणी करण्यात आली.

काय झाली तपासणी

कर्मचाऱ्यांच्या तपासणीसाठी ससून रुग्णालयाचे वैद्यकीय पथक गेले होते. या पथकाने सरकारी कर्मचाऱ्यांची वजन, उंची, रक्तदाब आणि रक्तशर्कराची तपासणी केली. एकूण १६० कर्मचाऱ्यांची ही तपासणी करण्यात आली. या तपासणीत स्थूल आढळलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय पथकाने समुपदेशन केले. त्यांना स्थूलपणाला प्रतिबंध कसा करता येईल? यावर मार्गदर्शन करण्यात आले.

कर्मचाऱ्यांना होणार फायदा

सरकारी कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे. यातून त्यांना त्यांच्या आरोग्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. आरोग्य चांगले राखण्यासाठी कसा आहार करावा, व्यायाम अन् योगासने करावी, आपण अन् आपल्या परिवाराचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल, यासंदर्भात माहिती दिली जात आहे. या उपक्रमानंतर किती कर्मचाऱ्यांचे वजन कमी होऊन लठ्ठपणा कमी होणार? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.