पुणे | 22 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सडेतोड स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांच्यासोबत बैठक असली म्हणजे अधिकारी चांगली तयारी करत असतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी बैठकांचा धडाका लावला आहे. तसेच सकाळी सहा वाजताच विकास कामांची पाहणी ते करत आहेत. पुण्यातील विविध प्रकल्प आणि संस्थांचा आढावा घेत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचा आढावा घेत असताना त्यांनी कारभारावर नाराजी व्यक्त केली. तसेच अधिकाऱ्यांना दमही भरला. कारभारात सुधारणा करण्याचे आदेश त्यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी प्रथमच जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शिक्षण विभागाचा कारभारावर नाराजी व्यक्त करत अजित पवार म्हणाले की, शाळांच्या मान्यतेच्या फाईली ‘वजन’ ठेवल्याशिवाय मंजूर होत नाही. यासंदर्भात शाळांनी शिक्षण विभागाशी संपर्क साधल्यावर प्रस्तावात काहीतरी त्रुटी काढल्या जातात. शिक्षण विभागात सुरु असलेला हा गैरकारभार वेळीच सुधारा, अन्यथा कारवाई होईल, या शब्दांत पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दम भरला.
लोकसभेच्या निवडणुका जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्हा परिषदेचा निधी खर्च करा, अन्यथा हा निधी परत जाईल,’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे. जलजीवन मिशनची कामे रखडलेली आहे. ज्या ठेकेदारांकडून कामे रखडली गेली आहे, त्यांना काळ्या यादीत टाका, असे आदेश अजित पवार यांनी दिले. मंजूर झालेल्या कामांना आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले.
अजित पवार यांनी पुणे शहरातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यावर भर दिला आहे. यासाठी सकाळी सहा वाजताच विकास कामांची पाहणी करत आहे. अधिकाऱ्यांना सूचना देऊन कामे वेळेत करण्याचे आदेश देत आहे. पुणे मेट्रो, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन यासंदर्भात त्यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.