पुणे | 28 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना-भाजपशी घरोबा केला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. आता अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद हवे आहे. परंतु भाजपलाही हे पद आपल्याकडेच हवे आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुप्त संघर्ष पाहण्यास मिळत आहे. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर होत आहे.
पुण्याच्या कारभारात अजित पवार गटाकडून कुरघोडी केली जात असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यात बैठकांचा धडाखा लावला आहे. मात्र या बैठकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील नसतात. अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे चंद्रकांत पाटील यांचा गट नाराज असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडचे दौरे केले आहेत. या दौऱ्यात त्यांनी बैठका घेण्याचा धडका लावला आहे. तसेच जुन्या विधानभवनात वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्या बैठकाही घेतल्या आहेत. पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील या बैठकांना नसतात. जिल्ह्यातील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितमध्ये अजित पवार हेच बैठका घेत आहेत.
बैठकासंदर्भात माध्यमांनी अजित पवार यांना विचारले असते, ते म्हणाले की, मी ही मंत्री आहे. मला बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी वैतागले आहेत. कोणाचे ऐकायचे? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
भाजपचे कार्यकर्ते प्रशासनाकडे कामे घेऊन गेल्यास त्या ठिकाणी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आधीच असतात. त्यांची कामे होतात. परंतु भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे होत नाही. सर्वच कार्यकर्त्यांना हा अनुभव येत आहेत. यामुळे या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय पुणे जिल्ह्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे.