पुण्यात दारुच्या नशेत अडीच कोटींची पोर्शे कार बेदरकारपणे चालवून, अल्पवयीन आरोपीनं 2 सॉफ्टवेअर इंजिनिअर्सचा जागीच जीव घेतला. मात्र, यानंतर पुणे पोलिसांच्या कारवाईवरुन पुणेकर आणि विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत. त्याचं कारण आहे, पुणे पोलिसांच्या 2 भूमिका… आणि त्यामुळं आरोपीला तात्काळ मिळालेला जामीन! ज्युवेनाईल कोर्टात हजर करुन पुणे पोलिसांनी सांगितलं की आरोपीचा अल्कोहोल रिपोर्ट निगेटीव्ह आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या 12 तासांनंतर ब्लड सॅम्पल घेवून टेस्ट करण्यात आली. 12 तासांनी रिपोर्ट आल्यावर म्हणजे रविवारी संध्याकाळी 4 च्या दरम्यान आरोपीला कोर्टात हजर केलं. आणि आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार सांगतायत की अजून ब्लड रिपोर्टच आलेला नाही. कोर्टानं आरोपी अल्पवयीन कडक शिक्षा देता येत असल्यानं नाही, अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून काही अटी शर्थी सह जामीन दिला. आता प्रश्न हा आहे की, जर आरोपीचा अग्रवालचा ब्लड रिपोर्टच आला नव्हता तर मग कोर्टात रिपोर्ट निगेटीव्ह आहे असं कसं सांगितलं?
रविवारी मध्यरात्री अडीच वाजताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सीसीटीव्हीत पोर्शे कार वायू वेगानं जाताना दिसतेय. प्रत्यदर्शींच्या म्हणण्याप्रमाणं ही कार 200च्या स्पीडमध्ये होती. कल्याणी नगरमध्ये विशालनं दारुच्या नशेत पल्सर बाईकला उडवलं, ज्यात अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मित्रांसोबत पबमध्ये दारु पित असतानाचा सीसीटीव्ही व्हिडीओ सुद्धा समोर आलाय.
अल्पवयीन आरोपी हा 17 वर्षे 8 महिन्यांचा आहे, म्हणजेच अवघ्या 4 महिन्यांमुळं त्याच्यावर बाल न्याय कायद्यानुसार अर्थात ज्युवेनाईल अॅक्टनुसार कलमं लागली. अपघाताआधी अल्पवयीन आरोपी 10 ते 12 मित्रांसह पुण्याच्या मुंढवा इथल्या कोझी पबमध्ये आला. कोझी पबमध्ये अॅब्सोल्युट ब्ल्यू, होएगार्डन, जे डब्ल्यू, आणि ब्लॅक लेबलची एवढ्या प्रकारची दारु प्यायला. कोझी पबनंतर अल्पवयीन आरोपी त्याच्या मित्रासह पुन्हा रात्री 12 ते 1 च्या दरम्यान मुंढवा इथल्याच ब्लॅक पबमध्ये आले आणि इथं पुन्हा दारु प्यायले. आता पुण्याचे पोलीस आयुक्त सांगतायत की जिल्हा कोर्टात अर्ज केला असून सज्ञान अर्थात प्रौढांप्रमाणं कारवाई व्हावी.
अल्पवयीन आरोपी हा पुण्यातले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. फरार विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी संभाजीनगरहून अटक केलीय. तर अल्पवयीन मुलाला दारु दिल्याप्रकरणात कोझी पब आणि ब्लॅक पब हे दोन्ही पब उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आले आहेत.
पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी पुणे पोलिसांवर पैसे घेवून आरोपीला सोडण्याचे प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत. तर संजय राऊतांनी पोलीस आयुक्तांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. पोलिसांवर आरोप झाल्यानंतर, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून कडक कारवाईचे आदेश दिले.
पोलिसांना आरोपी अल्पवयीन आरोपीने जो जबाब दिला, त्यानुसार आपण कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आणि वाहन चालवण्याचा परवानाही नाही अशी कबुली दिली. मी दारु पितो हे वडिलांनाही माहिती आहे. तरीही स्पोर्ट्स प्रोर्शे कार मला दिली, असा जबाब आरोपीनं दिलाय. धक्कादायक बाब म्हणजे या पोर्शे कारची नोंदणीही झालेली नाही. रजिस्ट्रेशन पूर्ण न करताच मुंबईच्या डिलरनं ही कार विशाल अग्रवाल यांना दिली.
रईस बापाच्या मुलानं, ज्या दोघांचा जीव घेतला, ज्यात 2 इंजिनिअर्सचा दुर्दैवी अंत झाला. अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा दोघेही पुण्यात जॉन्सन कंट्रोल कंपनीत काम करत होते. दोघेही चांगले मित्र असल्यानं सोबत फिरायचे पण रविवारची रात्र अखेरची ठरली. अश्विनीने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. पण त्याआधीच तिचा अपघातात अंत झाला. अश्विनी कोस्टा तिच्या वडिलांना वाढदिवसाला सरप्राईज देणार होती. वडिलांचा वाढदिवस असल्यानं ती जबलपूरला येणार होती. मात्र वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याआधीच रईस बापाच्या मुलानं तिला कारनं उडवलं.
मुख्यमंत्री शिंदेंपासून ते गृहमंत्री फडणवीसांनी कडक कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पबचा मालक आणि मॅनेजरसह तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालीय. पण मुख्य आरोपी अल्पवयीन असल्यानं तूर्तास तो कडक कारवाईतून निसटलाय. अर्थात प्रौढप्रमाणं त्याच्यावर पुढं कारवाई होईल का? हे दिसेल. पण पैशांची मस्ती, रईस जादेगिरी आणि बिल्डर विशाल अग्रवालनं मुलावर कंट्रोल न ठेवल्यानं निष्पाप तरुण तरुणीचा कायमचा जीव गेला.