योगेश बोरसे, पुणे | 3 ऑगस्ट 2023 : पुणे येथील डीआरडीओ माजी संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी लैलाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. हे प्रकरण उघड झाल्यानंतर एटीएसने त्यांना अटक केली होती. DRDO चे संचालक राहिलेला प्रदीप कुरुलकर एटीएसला चौकशीत सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याची पॉलीग्राफ टेस्ट आणि व्हाईस लेअर चाचणी करण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. त्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली आहे. तसेच कुरुलकर याच्या दोन मोबाईलसंदर्भात मोठे पाऊल एटीएसने उचललले आहे.
प्रदीप कुरुलकर चौकशीला सहकार्य करत नाही. यामुळे त्याचे जप्त केलेल्या दोन मोबाईलचा डेटा मिळवण्याचा प्रयत्न विशेष तपास पथक करत आहेत. कुरुलकर याने दोन मोबाईलमधील सर्व डेटा डिलिट केला होता. त्यामुळे एक मोबाईल राजस्थानमधील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय एटीएसने घेतला आहे. तसेच दुसरा मोबाईल दुरुस्त करण्यात येणार आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास अजून बाकी असल्याचे एटीएसच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
डीआरडीओचे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर डॉ. कुरुलकरकडून जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर नऊ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाकडून त्यांच्या जामीन अर्जास विरोध करण्यात येणार आहे.
प्रदीप कुरुलकर याची व्हाईस लेअर चाचणी आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी एटीएसकडून न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. परंतु या दोन्ही चाचण्यांना कुरुलकर यांच्याकडून विरोध केला जात आहे. व्हाईस लेअर चाचणीस प्रदीप कुरुलकर याच्या परवानगीची गरज नसल्याचे एटीएसने म्हटले आहे. आता यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
‘डीआरडीओ’चा माजी संचालक राहिलेला प्रदीप कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्त हिला गोपनीय माहिती पुरवल्याचे उघड झाले आहे. देशातील संवेदनशील माहिती त्याने झारा दासगुप्ताच्या माध्यमातून पाकिस्तानला पुरवल्याचे तपासातून समोर आले. व्हॉटसॲप मेसेज, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलद्वारे या पद्धतीने ही माहिती त्यांनी दिली.