पुणे | 17 सप्टेंबर 2023 : सध्या गणेशोत्सवाची तयारी सुरु आहे. गणेश उत्सवासाठी पुणे शहरात देश-विदेशातून अनेक पर्यटक येतात. त्यामुळे या काळात पुणे शहरातील हॉटेलचा व्यवसाय तेजीत असतो. गणेशोत्सव 28 सप्टेंबरला संपणार आहे. त्यानंतर 19 ऑक्टोंबरला पुणे शहरातील सर्वच प्रतिष्ठीत हॉटेलचे बुकींग पूर्ण झाले आहे. अगदी चढ्या दराने त्या हॉटेलचे बुकींग झाले आहे. यामुळे या तारखेला काय आहे की पुण्यातील बुकींग पूर्ण झाले.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक स्पर्धेचे सामने भारतातल्या विविध शहरांमध्ये होणार आहे. 19 ऑक्टोंबर भारत-बांगलादेश या दोन्ही संघातील सामना पुणे शहरात होणार आहे. यासाठी पुण्यातील हॉटेलचे बुकींग फुल्ल झाले आहेत. या दरम्यान रुमचे भाडेही वाढवण्यात आले आहे. 16 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान पुणे शहरातील हॉटेलची बुकींग पूर्ण झाल्याची माहिती पुणे हॉटेल असोशिएशनचे अमित शर्मा यांनी सांगितले
पुणे शहरातील पंचतारांकीत हॉटेलचे दर 8,000 ते 10,000 एका रात्रीसाठी होते. परंतु 19 ऑक्टोंबरला हे दर 19 ऑक्टोंबरला 20,000 ते 25,000 पर्यंत गेले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळे पुणे शहरातील हॉटेलचे दर वाढल्याचे अमित शर्मा यांनी सांगितले. पुणे शहरातील नामांकीत पाच ते सहा हॉटेलमध्येच बुकींगला प्राधान्य दिले गेले आहे. तसेच इतर हॉटेल चालकांनीही या काळातील दरात वाढ केली आहे.
.पुणे येथील क्राउन प्लाझाचे महाव्यवस्थापक अनुराग राहा म्हणाले की, पुढील महिन्यात बांगलादेश-भारत सामन्यामुळे चांगल्या व्यवसायाची अपेक्षा आहे. सामन्याच्या कालावधीत रुमचे दर देखील जवळपास 50 टक्के जास्त असते.
भारत-बांगलादेश सामन्यामुळे देशातील आणि विदेशातील क्रिकेटप्रेमी पुण्यात सामना पाहण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत हॉटेल व्यवसाय चांगला असणार आहे. अनेकांनी सामना निश्चित होताच आपले हॉटेल बुकींग पूर्ण केले आहे. भारत बांगलादेश सामन्याच्या वेळी पुण्यातील बाजारपेठेत उत्साह असेल, असे हिल्टनच्या डबल ट्रीचे महाव्यवस्थापक विनय नायर यांनी सांगितले.